पवारांच्या ‘दहशतवाद’ विरुद्ध निवडणूक आयोग, पोलीस प्रशासनाकडे तक्रार करणार : गिरीश बापट

महायुतीच्या उमेदवाराविना जाहिरनाम्याचे प्रकाशन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी ज्यांचे मतदान नाही अशी बाहेरून मोठी फौज मावळ आणि शिरूर मतदार संघात आलेली आहे. या फौजच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवारांचा सुरू आहे. त्यांचा प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. याबाबत पोलीस प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करुन कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. यावेळी मावळ लोकसभेचे महायुतीचे श्रीरंग उर्फ अप्पा बारणे या उमेदवाराच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी युतीचे उमेदवारच उपस्थित नव्हते.

पिंपरीत महायुतीच्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, शिवसेना संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उमा खापरे, अमित गोरखे, स्थायी सभापती विलास मडिगेरी, अमोल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी उमेदवारच उपस्थित नव्हते.

गिरीश बापट म्हणाले की, संपूर्ण देशभरात भाजपला चांगले वातावरण आहे. त्या निवडणुकीत केलेली विकास कामे आम्ही लोकांसमोर मांडत आहोत. विरोधकांकडून झालेले आरोप कोर्टाने नाकारले आहेत. निवडणूक आयोगाची माफी मागण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. २०१४ साली जसे शिवसेना-भाजप महायुतीचे वातावरण होते, त्याचप्रमाणे आता लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या सभांमुळे महायुतीचे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवारासाठी त्यांच्या नेत्यांना तळ ठोकून बसावं लागत आहे. बाहेरचा फापट पसारा आणून लोकांची मते मिळत नाहीत, याचा विसर त्यांना पडला आहे. पुणे जिल्ह्यातील चारही जागा युती जिंकणार असा विश्वास बापट यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघात महायुतीने प्रचारात मुसंडी मारली आहे. लक्ष्मण जगताप आणि बाळा भेगडे यांच्या नेतृत्वात जोरदार प्रचार यंत्रणा सुरू आहे. सत्ता असताना राष्ट्रवादीला विकास करता आला नाही. गेल्या चार-पाच वर्षात आम्ही अनेक विकासाची कामे करून दाखवली. लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून त्यांनी आयात उमेदवार दिला. तर मावळमध्ये बाल हट्ट पुरविला. पुण्यात त्यांना उमेदवारच मिळत नव्हता. कुठल्याही परिस्थितीत आम्ही मावळची जागा जिंकून दाखविणार असल्याचे बापट यांनी सांगितले.