…म्हणून ‘मुंडे’ भक्तांनी आ. राजळेच्या गावी साजरी केली ‘पुण्यतिथी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाण्याचे राजकारण करून पाथर्डी शेवगावच्या पूर्व भागाला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुळा व पैठण धरणाचे पाणी येवू दिले नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन्ही तालुक्यातील शेतीसाठी पाट पाण्याची योजना मंजूर करून घ्यावी. अन्यथा बहुजन समाज सत्ताधारी आमदारांना कडाडून विरोध करेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्ता बडे यांनी दिला आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पाचवी पुण्यतिथी दत्ता बडे यांनी व सहकाऱ्यांनी आ. मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव गावातील उसाच्या शेतात जावून साजरी केली त्यावेळी बडे बोलत होते. दोन्ही तालुक्याच्या पूर्व भागातील कष्ठकरी शेतकरी वर्ग केवळ पाण्याअभावी रोजीरोटीसाठी हातात कोयता घेवून कारखानदारांचे उंबरे झिजवत आहे. चालू उन्हाळ्यात पाथर्डी तालुक्याचा पूर्व भाग भयाण दुष्काळाच्या झळा सोसत असताना पाथर्डी पासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव परिसर पाटपाण्यामुळे सदाहरित आहे हा विरोधाभास तालुक्यातील इतर कष्टकरी शेतकरी वर्गाला नाउमेद करत आहे.

राजळे कुटुंबिया कडे गेली २० वर्ष आमदारकी असून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी तालुक्यातील उसतोडणी कामगाराच्या उन्नतीसाठी आयुष्यभर लढा उभारला, मुंडे साहेबांच्या नावाने मते मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील उसतोडणी कामगाराच्या हातातील कोयता खाली ठेवण्यासाठी दोन्ही तालुक्याच्या दुष्काळी भागातील सर्वच पाझर तलाव पुनर्भरण करण्यासाठी कुकडी किवा उज्जनी तसेच मुळा व पैठण धरणाचे पाटपाणी आणण्यासाठी येत्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी विधानसभेत प्रश्न मांडून सरकारकडूनही योजना मंजूर करून घ्यावी, तरच येत्या निवडणुकीत बहुजन समाज आमदार राजळे यांच्या पाठीशी राहील. अन्यथा त्यांनी बहुजन समाजाला गृहीत धरू नये, असा इशारा यावेळी दत्ता बडे यांनी दिला.

जलसंधारण व लघुपाटबंधारे विभाग हा राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असून, या योजनेला राज्यसरकारने मंजुरी दिल्यास अधिक निधी आणण्यासाठी खासदार सुजय विखे यांनी केंद्रात याबाबत पाठपुरावा करण्याचा शब्द दिला आहे.

यावेळी डॉ ज्ञानेश्वर दराडे, शिवहरी ढाकणे, शैलेद्र जायभाय, अनिल जवरे, बाजीराव कीर्तने, विजय बडे, तुषार पालवे, चैत्यन्य मेहेर, शंकर बडे, सुदर्शन बडे, जालिंदर कराड, शुभम बडे, तुषार बडे,अजित बडे,संजय गायकवाड, किशोर कराड, लक्ष्मण बडे, अमोल बडे आदि उपस्थित होते.