घसरत्या पार्‍यामुळं द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ, झाले ‘हवालदिल’

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – वातावरणातील सततच्या बदलांमुळे शेती करणे अत्यंत अवघड झालेले आहे. शेतकऱ्यांचे तोंडाचे पाणी पळालेले आहे. जी पिके सहज आणि कमी खर्चात यायची ती आजच्या वातावरणातील दैनंदिन बदलामुळे खर्चिक झालेले आहे. मागील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात फुलोऱ्यात असलेल्या द्राक्ष बागांना अवकाळी पावासाने झोडपल्यानंतर मागील आठवड्यापासुन वाढलेल्या थंडीच्या लाटेमुळे द्राक्ष बागाईतदारांच्या संकटात आणखीनच भर पडलेली आहे. वाढत असलेल्या थंडीचा द्राक्षासह इतर फळबागा भाजीपाल्यांना फटका बसू लागला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केलेले होते. द्राक्षबागांमध्ये पाणी साचल्याने अनेक बागांमधील तयार घड सडुन गेले. खोडमुळ, बुरशीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर झाल्याने दिवसरात्र औषधांची फवारणी करावी लागल्याने शेतकऱ्यांवर आर्थीक संकट आले होते. परिसरातील सर्वच बागांना अवकाळीचा फटका बसल्याने तलाठी, कृषी विभागातील कर्मचारी आणि ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानींचे पंचनामे करण्यात आलेले होते. परंतु नुकसान भरपाई अजुनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

अवकाळीच्या संकटातून वाचलेल्या काही द्राक्ष बागांना आता थंडीने गाठले असुन मागील आठवड्यापासुन तापमान घसरत असल्याने याचा परिणाम द्राक्षबागांवर होऊ लागलेला आहे. तापमानात विलक्षण प्रमाणात घट होत असल्याने थंडीचा प्रकोप जाणवू लागला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक पुन्हा संकटात सापडलेला आहे. घसरलेल्या तापमानामुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊ लागले आहे. मण्यांच्या फुगवणीवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचा दर्जा घसरण्याची शक्यता आहे. थंडीचा गारवा आणि दुपारी उन्हाचा तडाखा यामुळे सनबर्निंगचाही धोका निर्माण होत आहे. द्राक्षबागांबरोबरच फळे, फिके व भाजीपाल्यांवर देखील थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे. थंडीपासुन द्राक्ष घडांचा बचाव करण्यासाठी शेतकरी घडांना पेपर लावत आहे. तसेच बागेच्या बाजुने साड्यांचे आच्छादन करत आहे. तसेच मिलीबग आणि तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी यलोट्रॅप पेपरही बागांमध्ये लटकविले जात आहे. त्यामुळे पेपर व साड्यांचा खरेदीचा आधिकचा खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

Yelow Trap Paper

जिल्ह्यातुन द्राक्षांनी मोठी निर्यात होत असली तरी यंदा निर्यातीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पडलेल्या अवकाळीने पासवामुळे निर्यातक्षम द्राक्षांसह इतर शेतीमालांच्या उत्पनादनावर मोठ्याप्रमाणावर फरक जाणवत आहे. सरासरी उत्पादनापेक्षाही कमी उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थीक कोंडी झालेली बघावयाच मिळाली आहे. या संकटातून वाचलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक निर्यातक्षम द्राक्षांना वाचविण्यासाठी प्रत्यन करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/