…तर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना पुणेकरांकडून ‘कात्रजचा घाट’

कोल्हापूर - सांगलीतील पूरस्थिती हाताळण्यात अपयश त्यामुळेच चंद्रकांत पाटील ' कोथरूड' मधून !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – कोल्हापूर – सांगली पूरस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघाची निवड केली आहे. परंतु पाटील यांच्या उमेदवारीच्या वृत्तामुळे शहर भाजपमध्ये विशेषतः कोथरूडमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून जर पाटील यांना कोथरूड मधून उमेदवारी दिली तर त्यांना ‘पुणेकर’ कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, अशी चर्चा काल रात्रीपासून राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेने सोबत युती आणि उमेदवारी निश्चितीवरही मॅरेथॉन चर्चा झाली. तसेच यापुढील काळात जनतेतून निवडणून येणाऱ्यांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान या बैठकीनंतर संभाव्य उमेदवारांची नावे पुढे येऊ लागली. त्यामध्येच प्रदेश अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव कोथरूड मतदार संघातून पुढे आले आहे. यानंतर मात्र कोथरूड भाजप मधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

कोथरूड पूर्वी पासून शिवसेना – भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनेचे जवळपास तीन दशक या मतदार संघावर वर्चस्व राहिले असून मागील निडणुकीत भाजपच्या प्रा. मेधा कुलकर्णी या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. तर नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट यांना विक्रमी मताधिक्य मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदार संघ निवडला असावा अशी चर्चा सुरू झाली आहे.

मात्र प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्याने या मतदार संघात लक्षणीय संख्येने असलेल्या ब्राम्हण समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. दुसरीकडे या मतदार संघातून निवडणूक लढविण्यास तयारी केलेले नगरसेवक मुरलीधर मोहोळ हे मुळशी तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. या मतदार संघात मुळाशीतील नागरिकांची संख्या निम्म्याहून अधिक आहे. तर या मतदारसंघात भाजपच्या नगरसेवकांचीही संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत स्थानिकांना संधी असताना बाहेरील उमेदवार कशासाठी अशी चर्चा चौकाचौकात सुरू झाली आहे.

दुसरीकडे ऑगस्ट मध्ये पहिल्या आठवड्यात सांगली आणि कोल्हापुर पाण्याखाली गेले असताना चंद्रकांत पाटील हे पुण्यात होते. या महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. केवळ राजकीय नेतृत्व म्हणून पाटील हे आपत्ती व्यवस्थापनात अपयशी ठरले अशी चर्चा कोल्हापुरात आहे. केवळ पराभवाच्या भितीने पाटील यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूड मतदार संघाची निवड केल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे युतीमध्ये पुण्यातील आठ मतदार संघात शिवसेनेला अद्याप एकही जागा देण्यात आलेली नाही. अशातच कोथरूड सारख्या बालेकिल्ल्यात बाहेरून उमेदवार आल्यास शिवसेना कितपत सहकार्य करेल हा प्रश्नच आहे. उलट पाटील यांच्यावरील रोषाचा लाभ कोथरूड मध्ये मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला होण्याची शक्यता वाढली आहे. राष्ट्रवादीने सामाजिक गणिते बांधून 2009 च्या विधानसभा निवडणुकी प्रमाणे यंदाही भाजप, शिवसेनेतून राष्ट्रवादीत येऊन लढायची तयारी ठेवणाऱ्या ब्राम्हण सामाजाच्या उमेदवाराचा शोध सुरू केल्याचे बोलले जात आहे. सर्वसंमतीचा उमेदवार मिळाल्यास पुणेकर पाटील यांना कात्रजचा घाट दाखवतील या विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Visit : policenama.com