दुष्काळाचा सामना करतानाच विकासकामांना गती : पालकमंत्री प्रा. शिंदे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचबरोबर रस्ते, जलसंधारण, कृषी, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देत जिल्हा विकासाच्या कामांना गती देण्यात आल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापन दि‍नाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशु सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने सक्षमपणे आणि तात्काळ निर्णय घेतले. दुष्काळ जाहीर केलेल्या गावातील ६ लाख ७९ हजार ४३६ शेतकऱ्याना ३७३ कोटीहून अधिक अनुदानाचे वितरण केले. आवश्यक तेथे मागणीनुसार चारा छावण्या सुरु करण्यात आल्या. रोजगार हमी योजनेत ३४ हजार २५४ कामांचे शेल्फही तयार केले. पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून एकूण ९६ गावांसाठी ८० कोटी, जलस्वराज्य मधून ४५ कोटी निधी देण्यात आला. मागील ४ वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी ४४ कोटी ८९ लाख रुपये निधी देण्यात आला. जिल्ह्यातील एकूण ७४६ गावांसाठी २६८ योजनांसाठी ६६७ कोटी ४२ लाख रुपया्ंची तरतूद केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ३ लाख ५ हजार ७०० शेतकर्‍यांना १ हजार २७ कोटी ६७ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे २ लाख २० हजाराहून अधिक शेतकर्‍यांना १२१ कोटी २९ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार अभियानात मागील ४ वर्षात १ हजार ३५ गावांत ३८ हजार ३४ एवढ्या कामांतून २ लाख २५ हजार ५९७ टीसीएम पाणीसाठा निर्माण करण्याची क्षमता तयार झाली तर ४ लाख ५१ हजार १९६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले. जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच तालुक्यात जलसंधारण व जलसंवर्धनाची कामे होत आहेत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत गेल्या ४ वर्षात २७२ तलावातील २ कोटी ७६ लाख ५ हजार ९०३ घनमीटर गाळ काढण्यात आला. यामुळे २ हजार ७६५ घनमीटर पाणीसाठा निर्माण झाल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यात धरणक्षेत्रात झालेल्या पावसाने नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला. पूर आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. कोल्हापूर-सांगली भागातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हावासियांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी स्वागत करुन एकमेकांसाठी अडचणीच्या काळात पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही आपली संस्कृती असल्याचे प्रतिपादन केले.

कृषीपूरक योजनांच्या अंमलबजावतील जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले. मागेल त्याला शेततळे, कांदाचाळ, नियंत्रित शेती, कृषी अवजारे वाटप आदी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकर्‍यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले. तेहतीस कोटी वृक्षलागवड मोहिमेत आतापर्यंत ७० लाख ९५ हजार ९६८ इतक्या रोपांची लागवड झाल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात विविध विकासकामे सुरु असून जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जिल्हा अंतर्गत रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरणासाठी भरीव निधी प्राप्त झाला तसेच जिल्हा नियोजन समितीचा 570 कोटी रुपयांचा अंतिम आराखडाही आपण मंजूर केल्याचे ते म्हणाले.

विविध महामंडळांना आर्थिक सक्षम करुन त्यामार्फत संबंधित समाज घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक समाजघटकांच्या भावना लक्षात घेऊन त्या समाजाच्या विकास आणि उन्नतीसाठी विविध निर्णय राज्य शासनाने घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. आपला जिल्हा केरोसीनमुक्त झाला असून आतापर्यंत उज्ज्वला योजनेंतर्गत २ लाख ९९ हजार ८६५ कुटुंबाना गॅसजोडणी देण्यात आली आहे. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानात आपण ७ हजार ३२० कुटुंबांना गॅसजोडणी दिल्याचे सांगून शिधापत्रिकांच्या संगणकीकरणीमुळे प्रतिमहिना ४ हजार ५०० मेट्रीक टन धान्याची बचत होत असल्याचे ते म्हणाले.

सर्वांसाठी घरे या महत्वाकांक्षी कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु आहे. आतापर्यंत २४ हजार ७२४ घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. सर्व समाजघटकांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच अहमदनगर पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड अशी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा आदर्श तलाठी पुरस्काराचे वितरण, राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांचा गौरव आणि हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची याअंतर्गत निवड झालेल्या बचतगटांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी- गोराणे सिध्देश, जोशी अवधुत, मुळे आशितोष, कडूस श्रृती, पवार चैतन्य, जाधव शार्दुल, लवांडे प्रणव, काळोखे वेदांत, निर्मल प्रसाद, गुगळे रोशन, बोडखे अथर्व, औटी श्रेया, वाघ अविनाश, कलांगे संस्कृती, पंचारिया चिन्मय, पटारे धनश्री, बागल श्रेयस, कार्ले आयुष, तोटे तनिषा, कोल्हे अभिजीत, घुंघार्डे ऋषीकेश, जोरी ऋषीकेश, गोराडे विजय, तांबे आदित्य, नलावडे शुभम, बाबरिया हर्षित, मोरे प्रणाती, अहमदनगर पोलिस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड अशा चांगल्या कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी / कर्मचारी यांचा गुणगौरव- पोलीस उप. नि. सतिष नामदेव शिरसाठ, दशरथ हटकर, राखीव पो.नि. रऊफ शेख, सहा. फौजदार, वसंत वाव्हळ, सहा. फौजदार, सल्लाउद्दीन शेख, पो. हवालदार, सखाराम मोटे, पोलिस हवालदार, सचिन पवार, पोलिस नाईक, पो. नि. दिलीप पवार, पो. उपनि ज्ञानेश फडतरे, स. पो. उप. निरी. सोन्याबापू नानेकर, पोना दिपक शिंदे, पोको मेघराज कोल्हे, मंगेश बेंडकोळी, पो. उप. निरिक्षक, समाधान सोळंके, पो. उप. निरिक्षक, स.पो. उप. निरीक्षक राजेंद्र गर्गे, पोना अजित घुले, पोको अभिजीत अरकल, स. पो. उपनि. शेख रऊफ समद, पोसई रितेश, पो. उप. निरिक्षक, पोनि राजेंद्र पाटील, पोकॉ रविंद्र निमस राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर- बी. टी. घोरतळे, एस. आर. कुसळे, पी.बी. अहिरराव, एस. एम. सराफ, ए. बी. बनकर, अनिल पाटील हिरकणी-नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर निवड झालेल्या बचत गटाचा सत्कार- आत्मारामगिरी महिला बचत गट, मिरजगाव, साई द्वारकामाई महिला बचत गट, लोहगाव, गुरू माऊली महिला स्वयं सहायता महिला बचत गट, ब्राम्हणी, मुक्ताई महिला स्वयंसहायता समुह ढोकी, रणरागिणी महिला स्वयंसहायता बचतगट, खांडगाव, मार्गदर्शन महिला स्वयं सहायता बचत गट, श्रीगोंदा, जयभोलेनाथ महिला स्वयं सहायता बचत गट, भेंडा, प्रगती महिला बचत गट, सांगवी, कालिका महिला स्वयं सहायता बचत गट, शिंगवे, वसुंधरा स्वयंसहायता बचत गट, नवलेवाडी.

आरोग्यविषयक वृत्त –