चंद्रकांत पाटलांचं ‘लॉन्चिंग’ पुर्वीच झालं आता ‘लॅन्डिंग’ ! ‘एका दगडात दोन पक्षी’ टिपण्यासाठीच काय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पालकमंत्री पदावरून लोकसभेत पाठविलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीष बापट यांना पर्याय म्हणून कोल्हापूरचे ‘पैलवान’ चंद्रकांत पाटील यांना थेट कोथरूडच्या मैदानात उतरवले गेले आहे. एकीकडे जिल्ह्यातील प्रमुख विरोधक पवारांना शह तर दुसरीकडे बापट पुणे भाजप वरील ‘दबदबा’ कमी करण्यासाठी असा ‘एका दगडात दोन पक्षी’ टिपण्यासाठीच भाजपने पाटील यांचे पुण्यात ‘लॉन्चिंग’ यापुर्वीचं केलं होतं आता थेट ‘लॅन्डिंग’ची तयारी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कोथरूड मतदार संघातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. पक्षाचा हा निर्णय भाजप कार्यकर्तेच नव्हे तर भाजपच्या मतदारांच्याही काही केल्या गळी उतरत नाही. अगदी शेजारच्या मतदार संघातील कार्यकर्त्यालाही उमेदवार म्हणून न स्वीकारणारे ‘टिपिकल’ पुणेकर इतर जिल्ह्यातील उमेदवाराला निवडणे तसे अवघडच, असेच काही पुणेरी टोमन्यांमधून दिसून येत आहे. परंतु पाटील यांच्या या ‘लॉन्चिंग’ ची सुरुवात यापूर्वीच झाली आहे. आता केवळ लॅन्डिंग बाकी आहे.
पाटील पुणे पदवीधर मतदार संघातून निवडून आले आहेत.

राज्यात सत्ता नसतानाही शहर भाजपने त्यांच्या मागे ताकद उभी करत हा विजय मिळवून दिला. 2014 मध्ये केंद्रात सत्ता आल्यानंतर राज्यात सत्ता आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आणि यशही मिळवले. दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील अर्थात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर मध्ये पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपवण्यात आली. केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या बळावर अन्य पक्षातील तगडे उमेदवार शोधून भाजप मध्ये आणणे आणि पक्ष मजबूत करणे हे काम पाटील यांनी चोखपणे पार पाडले. यातूनच सांगलीची पालिकाही ताब्यात घेतली.

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाजप म्हणजे चंद्रकांत पाटील, असे समीकरण तयार झाले. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सातारा आणि पुणे जिल्ह्यात भाजप मजबूत करण्यासाठी पाटील यांना बारामतीची गढी काबीज करण्याची मोहीम सोपविण्यात आली. त्यात अपयश आले असले तरी पवार कुटुंब पुणे जिल्ह्यातच अडकून पडल्याचा लाभ भाजपला झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान लोकसभा निवडणूकित भाजपचे पश्चिम महाराष्टातील वजनदार नेते गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदार संघातून विजयी झाले. त्यांनी पालकमंत्री पदासोबत कसबा विधानसभेचा राजीनामा दिला. त्याचवेळी भाजपने पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद सोपविले. एकीकडे पुणे शहरातील सात मिळून जिल्यात 12 आमदार असताना चार महिन्यांसाठी पालकमंत्री पद सोपवत पाटिल यांचे पुण्यात ‘लॉन्चिंग’ केले. त्याचवेळी पाटील पुण्यातून बापट यांच्या रिक्त झालेल्या कसबा मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली. अशातच पाटील यांच्याकडे प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा आल्याने ते अधिकच बलशाली झाले. ही सगळी खेळी पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून झाल्याचे आता हळूहळू उघड झाले आहे.

परंतु रिक्त कसबा मतदार संघाऐवजी थेट कोथरूड मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी देत यापुढे शहर भाजपचे गेली 25 वर्षे असलेले कसब्यातुन चालणारे नेतृत्व आता कोथरूड मधून होणार असा एक संदेश यानिमित्ताने खासदार बापट यांना देण्याचा प्रयत्नही यातून झाल्याची चर्चा आहे. वरिष्ठांची ही रणनीती जुन्या पिढीतील भाजपेयींना किती रुचणार की ‘उगवत्या सुर्याला नमस्कार ‘ करणारी मंडळी ताबा घेणार हे निकालानंतर दिसून येईल. तूर्तास तरी सर्व काही मोदींच्या करिष्म्यावर निभाहून जात असल्याने उघडपणे पक्ष्याच्या आदेशाच्या विरोधात जाण्याची हिंमत कोण करेल असे वाटत नाही.

Visit : Policenama.com