युती झाल्यास हडपसर शिवसेनेला ?

नाना भानगिरे असतील शिवसेनेचे उमेदवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युतीची घोषणा न झाल्याने अद्यापही निवडणुकीचे चित्र अस्पष्ट आहे. त्यातही सर्वाधिक उत्सुकता आहे ती, पुण्यात काय होणार याची. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असल्याने कोणाचे तिकीट कापून शिवसेनेला पुण्यात जागा सोडली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यातही हडपसर, शिवाजीनगर किंवा खडकवासला यापैकी एक मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची तयारी भाजपने केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळत आहे.

हडपसरमध्ये भाजपचे योगेश टिळेकर हे विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ त्यांच्याकडेच टिकविण्यासाठी ते प्रयत्नात आहेत. मात्र, शिवसेनेच्या इच्छुकांनी एकत्रित पत्रकार परिषद घेवून हा मतदारसंघ युतीत शिवसेनेसाठी राखीव ठेवण्याची मागणी केल्याने येथे मोठी चुरस निर्माण झाली आहे.

हडपसरची शिवसेना !
हडपसरमधील शिवसेनेचा विचार केल्यास हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. पूर्वीच्या कॅंटोनमेंट मतदारसंघाचा बराचसा भाग या हडपसर मतदार संघात समाविष्ट आहे. कै. सूर्यकांत लोणकर यांच्यापासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मधल्या काही काळात काँग्रेसने देखील ही जागा जिंकली होती. मात्र, शिवसेनेचा पारंपरिक मतदार याठिकाणी टिकून असल्याचे गेल्या सलग तीन लोकसभा निवडणुकीतही दिसून आले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्यांपैकी प्रमोद (नाना) भानगिरे हे एक महत्त्वाचे नाव समजले जाते. पुणे महापालिकेत तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले भानगिरे यांनी विधानसभेसाठी यंदा जोरदार तयारी सुरू केली असून, अनेक भागांमध्ये त्यांनी भेटीगाठींची फेरीही पूर्ण केली आहे. ‘मावळा शिवरायांचा , आमदार हडपसरचा’, अशी चर्चा आता हडपसरमध्ये रंगू लागली आहे. त्यांनी त्यांच्या प्रभागात केलेली विकास कामे, तगडा जनसंपर्क आणि नातीगोती यांच्या जोरावर भानगिरे हे हडपसरचा गड सर करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येते. भानगिरे यांच्यासह माजी आमदार महादेव बाबरही तिकिटासाठी प्रयत्न करत आहेत.

आघाडीचा वाद पथ्यावर पडणार ?
दुसरीकडे एकाच विधानसभा मतदारसंघात तुपे, घुले, भोसले, जगताप अशी बलाढ्य घराणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इच्छुकांकडून तयारी सुरू आहे. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात येऊ नये, अन्यथा आघाडीचा धर्म पाळणार नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे हा वाद युतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

Visit : policenama.com