सावधान ! कर्नाटकातून येतोय ‘देवगड हापूस’ ; वापरला जातोय फसवणूकीचा ‘हा’ नवा फंडा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात प्रचंड लोकप्रिय असलेला आणि आपल्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्धी पावलेल्या देवगड हापूस आंब्याबाबत खवय्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्याचा प्रकार पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी होत असतो. देवगडच्या आंब्याच्या पेटीत रत्नागिरी व इतर ठिकाणचे काही हापूस आंबा घालून फसवणूक केली जात होती. पण आता कर्नाटकातून आख्खी पेटीच बनावट देवगड हापूसची येऊ लागली आहे.

कर्नाटकातून आलेल्या ट्रकमध्ये ‘देवगड हापूस’ असे छापलेले आंब्याचे खोके दिसत आहेत. देवगड हापूस आंब्याची विशिष्ट अशी चव आहे. असे असेल तरी असंख्य लोकांना देवगड आंबा कसा ओळखायचा हे समजत नाही. त्याचा गैरफायदा घेऊन देवगडच्या नावाखाली यापूर्वी रत्नागिरीचा हापूस विकला जात असे. मात्र, त्या खोक्यात जर रत्नागिरीचे वृत्तपत्र आढळून आले तर ग्राहकांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येत असे.

पण कर्नाटकाच्या व्यापाऱ्यांनी त्याच्या पुढची मजल मारली आहे. त्यांनी चक्क देवगड हापूस या नावाने खोकी छापून घेतली. इतके नव्हे तर त्यांनी त्यामध्ये त्यांनी देवगडमधील वृत्तपत्राचे कागद वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांना हा खरच देवगडचा हापूस नसून कर्नाटकातील कमी प्रतीचा हापूस आंबा असल्याचे समजत नाही़.

आपल्याला चांगला आंबा मिळाला नाही असे ग्राहकांना वाटते. प्रत्यक्षात त्यांना व्यापाऱ्याने कमी प्रतिचा कर्नाटक हापूस भरमसाट किंमतीत विकलेला असतो. कोल्हापूरमध्ये अशा आंब्याचा सुळसुळाट झाला आहे. कर्नाटकातून आलेल्या ट्रकमध्ये देवगड हापूस असे छापलेली खोकी आढळून आली आहेत. यातील फोटो बारकाईने पाहिल्यास हे दिसून येईल.