हर्षवर्धन पाटील बुधवारी ठरवणार ‘कोणता’ झेंडा घेऊ हाती..?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – लोकसभेला आघाडी धर्माचे पालन करताना राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातुन ७१ हजार मताधिक्य देवुन आघाडी धर्माचे पालन केले. परंतु विधानसभेला राष्ट्रवादीकडून आघाडी धर्माचे पालन करण्यास विरोध होत असुन इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी तयार नसल्याने राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवार दिनांक ४ सप्टेबंर रोजी इंदापूर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील हे कार्यकर्त्यांची मते जाणुन घेणार असुन त्यामध्ये कोणता झेंडा हाती घ्यायचा हा मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता बळावली आहे. येत्या ७ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत असुन त्याच दिवशी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे.

संकल्प मेळाव्यात हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांशी विचार-विनिमय करुन राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे हा मेळावा राज्यामध्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण ठरणार असल्याने राष्ट्रवादीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांनी भाजप कडून लढवावी, असा आग्रह इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांना लोकसभेला तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला विधानसभेची जागा सोडू, असा शब्द दिल्याची चर्चा आहे. परंतु आता इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार नसल्याचे स्पष्ट संकेत परवाच्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेतील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या वक्तव्यावरून दिसुन येत असल्याने इंदापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते हे संतप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणूक होऊन तीन महिने झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर जागा सोडणे संदर्भात निर्णय घेत नसल्याने इंदापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांना सोडण्यात येणार नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्या यात्रेची सभा इंदापूर येथे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश स्पष्टपणे दिसून येत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

इंदापूर तालुक्याचा विकास होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून इंदापूर विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी जोरदारपणे काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलेला शब्द पाळला जात नसल्याचा इतिहास असल्याने इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांनी भाजपकडून लढवण्याचा निर्णय या मेळाव्यात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त