शेटफळ तलाव पूण क्षमतेने भरून घेणार : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी सध्या निरा डावा कालव्याचे आवर्तन चालु आहे. बारामती तालुक्यात तसेच त्या वरच्या भागात शुक्रवारी रात्री चांगला दमदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात निरा डावा कालव्याचे पाणी पुर्ण क्षमतेने आणून तातडीने ५९ ते ३६ फाट्या दरम्यानचे सर्व आवर्तन हे अल्पावधीत पुर्ण करून शेटफळ तलाव भरून घेणेसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी (शनिवारी) इंदापूर येथे दिली.

इंदापूर तालुक्यातील शेवटचा फाटा लाखेवाडी ५९ ते ३६ सणसर पर्यंत मागेल त्या सर्व शेतक-यांना तातडीने आवर्तन देऊन शेटफळ तलावात पाणी सोडणे संदर्भात पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी (दि.२०) रोजी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेनुसार वरील प्रमाणे तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना खाली देण्यात आल्या आहेत.

शेटफळ तलाव हा गेल्या वर्षी कोरडा पडला आहे. त्यामुळे गेली वर्षभरापासून तलावाच्या लाभक्षेत्रात नऊ गावांमध्ये पाण्याअभावी परिस्थिती गंभीर बनलेली आहे. त्यामुळे निरा डावा कालव्यातून शेटफळ तलावात पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याच्या व जनावरांच्या चार्‍याच्या प्रश्नाची तीव्रता कमी होऊन शेतकरी व नागरीकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहितीही याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like