औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजारावरील उपचारासाठी एक औषध व त्या औषधाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी दुसरे औषध व दुसऱ्या औषधाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी तिसरे औषध आपणास घ्यावे लागते. हीच सध्याच्या औषध पद्धतीची शोकांतिका आहे. त्यामुळे औषधे घेताना अन्न व औषधांच्या परस्पर क्रिया यांच्याविषयी माहिती घेऊन ती काळजीपूर्वक घ्यावीत.

न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार जेथे क्रिया तेथे प्रतिक्रिया ही ठरलेलीच. आपण खात असलेल्या अन्नामध्ये अशी खूपशी रसायने असतात की जी औषधांचा परिणाम वाढवू किंवा कमी करू शकतात. म्हणून कोणतेही अन्न किंवा औषध घेताना त्यावरील लेबल अथवा वेस्टण व्यवस्थित वाचणे अत्यावश्यक आहे.

औषधासोबत हे पदार्थ घेणे टाळा –

हिरव्या पालेभाज्यांमध्ये असणारे ‘के’ जीवनसत्त्व व रक्त पातळ करणारी वारफेरिनसारखी औषधे टाळावीत. आपल्याकडे वापरला जाणारा जेष्ठमध हाही जास्त काळ व जास्त प्रमाणात घेतला गेल्यास शरीरातील पोटॅशियम कमी होते व सोडियम वाढते. म्हणून हृदय रोगाच्या रुग्णांनी व डीकॉगझीनसारखे औषध घेणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

जुन्या काळी रक्तदाब हृदयरोग असणारे सर्व रुग्ण सरसकटपणे मीठ अन्नातून पूर्ण वर्ज्य करत. सध्या बरेचसे लोक ‘लो सोडियम’ किंवा त्याऐवजी पोटॅशिअम सॉल्ट वापरतात. ही एक चांगली गोष्ट आहे, पण काही औषधे ज्यामध्ये डीकॉगझीन व ‘एसी इनहीबिटर’ यांचा समावेश आहे ही औषधे रक्तातील पोटॅशियम वाढवतात, म्हणूनच अशी औषधे घेणाऱ्यांनी मीठ पूर्ण वर्ज्य करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अमेरिकेमध्ये ग्रेपफ्रूट ज्यूस हा एक अतिशय लोकप्रिय ज्यूस. हा ग्रेपफ्रूट ज्यूस कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या स्टॅटिन औषधांबरोबर घेऊ नये. तसेच रक्तदाब, ऍलर्जी, ॲसिडीटी, संततिनियमनाच्या गोळ्या घेत असाल, तर ग्रेपफ्रूट ज्यूस टाळणेच उत्तम. चॉकलेट, चीज, मटन, सोयाबीन वगैरेमध्ये टायरामाईन जास्त प्रमाणात असते. असे टायरामाईनयुक्त अन्नपदार्थ जर जास्त प्रमाणात खाल्ले तर, नैराश्य व पार्किन्सनमध्ये दिले जाणारे मोनोअमाईन ऑक्सिडेज इनहिबिटर औषधे घेताना काळजी अभिप्रेत आहे.

अल्कोहोल म्हणजेच दारू हाही एक असाच यकृतावर परिणाम करणारा घटक. त्यामुळे खूप सारी औषधे अल्कोहोलबरोबर घेणे योग्य नाही. मधुमेह, हृदयरोग, फिट अथवा अपस्मार, कर्करोग, डिजिटालीस, रक्त पातळ करणारी व प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी वापरली जाणारी औषधे घेताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

आयोडिन आणि दुधाचे पदार्थ एकत्र घेऊ नये –

थायरॉईडवरची औषधे व अन्नातील आयोडिनची खूप जवळचा संबंध आहे. सर्वसाधारणपणे समुद्री अन्नामध्ये आयोडीनचे प्रमाण जास्त असते. डोंगराळ प्रदेशातील लोकांमध्ये आयोडीनची कमतरता आढळून येते. थायरॉईड प्रतिबंधक औषधे ही पोटामधून आयोडीनचे शोषण अथवा ग्रहण थांबवतात. जर अन्नामध्ये खूपच जास्त आयोडीन असेल तर साहजिकच थायरॉईड प्रतिबंधक औषधाची मात्रादेखील जास्त गरजेची आहे. टेट्रासायक्लिन व इतर काही प्रतिजैविके कॅल्शियमबरोबर संयोग झाल्याने त्यांचा परिणाम कमी होतो. म्हणूनच अशी औषधे दूध, पनीर, दही व जास्त कॅल्शियम असणाऱ्या अन्नाबरोबर घेऊ नयेत. अशी औषधे जेवणाआधी एक तास घ्यावीत.

औषधाच्या उत्सर्जनासाठी यकृताची भूमिका महत्वाची –

औषधाच्या उत्सर्जनासाठी लागणारी पूर्वतयारी किंवा औषधांमधील बदल हे यकृताद्वारे घडवून आणले जातात. आपल्या यकृतामध्ये ‘सायटोक्रोम पी ४५०’ नावाची एन्झाइमची/ विकरांची फौजच सदैव तयार असते. त्यांना सर्वसाधारणपणे ‘सीवायपी’ असे संबोधले जाते. तोंडावाटे घेतली जाणारी सर्व औषधे ही यकृतामधून प्रक्रिया करूनच पुढे रक्तात जातात. यकृताला वैद्यकीय भाषेत ‘फर्स्ट पास इफेक्ट’ असेही म्हटले जाते.

औषध तोंडावाटे पोटामध्ये म्हणजेच जठरामध्ये जाते. जठरामध्ये सर्वप्रथम गोळी अथवा कॅप्सुल फुटून छोटे छोटे कण तयार होतात. हे छोटे-छोटे कण मग जठरामध्ये असणाऱ्या रसामध्ये पूर्णपणे विरघळतात. तिथून हे औषध रक्तामध्ये शोषले जाऊन सर्वप्रथम यकृताकडे जाते. या औषधाच्या चयापचयाचे काम हे यकृत करते. आपल्या यकृतामध्ये असणारी विकरे प्रत्येक औषधावर प्रक्रिया करून त्याला शरीराबाहेर टाकण्यासाठी काम करतात. असे कोणतेही औषध जे यकृतामधील मायक्रोसोमल विकरांचे कार्य थांबते किंवा वाढवते ते औषध जपूनच घ्यावे. बरीच औषधे ‘सीवायपी’ ला एक तर वाढवतात किंवा कमी करतात. म्हणजेच थोडक्यात ‘सीवायपी’ चा स्तर कमी-जास्त करू शकणारी काही औषधे इतर औषधांचा स्तर कमी अथवा जास्त करतात व त्यामुळे बाकीच्या औषधांचा परिणाम बदलू शकतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like