नाशिक जिल्ह्यात दरवर्षी सरासरी अडीच हजार क्षयरोगी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – क्षयरोग हद्दपार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येत असले, तरी त्यास अद्याप परिपूर्ण यश आलेले नाही. नाशिक जिल्ह्यात दरवर्षी क्षयरोगाचे सरासरी अडीच ते पावणे तीन हजार रुग्ण आढळून येतात. मागील वर्षी जिल्ह्यात जवळपास २ हजार ८०० रुग्णांना क्षयरोगाची लागण झाली असून, त्यातील २८ रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे.

थुंकीतून रक्त पडणे, छातीत वेदना होणे, दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला येणे, सतत हलकासा ताप येणे, जेवणाचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा जाणवणे आदी क्षयरोगाची प्रमुख लक्षणे आहेत. मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलॉसिस नावाच्या जीवाणुमळे क्षयरोगाची लागण होते. हा एक संक्रमक रोग असून, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात पसरतो. या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर फुप्फुसावर परिणाम होतो. क्षयरोगाच्या रुग्णांचे नवीन व पुनउर्पचार घेणारे अशा दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

क्षयरोगींना देण्यात येणाऱ्या बीसीजी लसीचा १९५२ पासून भारतात वापर करण्यात येत आहे. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात १६ क्षयरोग पथके, ७० मान्यताप्राप्त सूक्ष्मदर्शक केंद्र व १३८ आरोग्य संस्थांच्या सहकार्याने क्षयरोग नियंत्रण मोहीम राबविली जाते.