क्षयमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : डॉ. पवार

पुणे : पोलीसनामा ऑनसाईन – भारतात चाळीस टक्क्याहून अधिक लोक क्षयरोगाने संसर्गित असून परंतु यातून फक्त दहा टक्के लोकांना क्षयरोग होण्याची शक्यता असते. तसेच सहा हजाराहुन अधिक लोकांना दररोज क्षयरोग होतो याकरिता क्षयमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राजेंद्र पवार यांनी केले.

जिल्हा क्षयरोग केंद्र परिसरात क्षयरोग जनजागरण सप्ताहाचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी डॉ. पवार बोलत होते. यावेळी नांदेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी मिरकुटे यांनी सांगितले की, निदान झालेल्या प्रत्येक क्षय रुग्णांची, तो अतिक्षय गंभीर स्वरुपाचा (मल्टी ड्रग रेजिस्टंट) तर नाही ना ? याची तपासणी जिन एक्सपर्ट (सीबीनॅट) मशिनीद्वारे करुन घेणे बंधनकारक असून रुग्णांना औषधोपचारादरम्यान योग्य तो पोषण आहार घेता यावा म्हणुन दर महा ५०० रुपये हे त्या रुग्णांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले.

यासाठी सदर रुग्णानी बँक खात्याची झेरॉक्स प्रत देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार यांनी क्षयरोगाचे निदान, औषधोपचार, रोगाविषयीचे लक्षणे व घ्यावयाची काळजी आदी विषयावर मार्गदर्शन केले. तत्पूर्वी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातुन विद्यार्थ्यांनी क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमासोबतच, नांदेड, अर्धापुर, मुदखेड या तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी क्षयरोगाविषयी पुनर्रप्रशिक्षण घेण्यात आले.