सोरायसिस रुग्णांसाठी मोफत औषध

पोलीसनामा ऑनलाईन – सोरायसिस या त्वचारोगावर खासगीत मिळणारी महागडी औषधी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील त्वचारोग विभागात विनामूल्य देण्यात येत आहे. याचा १० ते १५ टक्के प्रमाणात सोरायसिस झालेल्या रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्वचारोग विभागप्रमुख डॉ. सुधीर मेढेकर यांनी केले आहे.

त्वचारोग विभागात सध्या सोरायसिस या आजारावर संशोधन सुरू आहे. या माध्यमातून हे औषध रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सोरायसिस हा एक त्वचारोग असून त्यात त्वचेवर लाल चट्टे येऊन कोंड्याप्रमाणे पापुद्रे निघतात. प्रतिकार शक्ती कमी झाल्याने हा आजार होतो. काहीअंशी हा आजार अनुवंशिकदेखील आहे. हा आजार अतिशय जर्जर मानला जातो. एकूण त्वचारोगाच्या दहा टक्के रुग्णांमध्ये सोरायसीस आढळतो.

हा आजार औषधोपचाराने नियंत्रणात ठेवता येतो. घाटीतील त्वचारोग विभागात गेल्या दोन महिन्यांपासून विनामूल्य औषध देण्यात येत आहे. या औषधासाठी बाहेर मोठी रक्कम मोजावी लागते. त्वचारोग विभागात येऊन १० ते १५ टक्के प्रमाणात सोरायसिस झालेल्या रुग्णांनी औषध घ्यावे, असे आवाहन डॉ. मेढेकर यांनी केले आहे.