दोन मेंदू असलेल्या अर्भकाला जीवदान, जिवंतपणी पुरणाऱ्या बापाला अटक 

पोलीसनामा ऑनलाईन – मेंदूला जोडून अन्य एक मेंदू असलेल्या अर्भकाला जिवंतपणी पुरणाऱ्या वडिलाला नौहत्ता पोलिसांनी अटक केली. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती सुधारत असून त्याचा ताबा मुलाच्या काकाकडे देण्यात आला आहे. नौहत्ता येथे राहणाऱ्या ४० वर्षीय इसमाच्या मुलाला मेंदूला चिकटून आणखी एक मेंदू विकसित होत होता. त्यामुळेच वडिलाने त्याला जिवंतपणी मृत्यू देण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सर्व तयारी केली.

जवळच्या कब्रस्तानात त्यांनी मुलाला दफन करण्यासाठी नेले. मात्र कबर खोदत असताना कबर खोदणाऱ्याला बाळाची हालचाल दिसली. त्याने याबाबत बाळाच्या वडिलांकडे विचारणा केली. त्यावर वडिलांनी सांगितले की, अशा पध्दतीचे बाळ आमच्या संपूर्ण कुटुंबात कधीच मान्य होणार नाही. कबर खोदणाऱ्याने जिवंत मूल पुरण्यास नकार दिला आणि त्याने तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी मुलाच्या वडिलांना ताब्यात घेतले. बाळाला तातडीने शेर-ए-काश्मीर रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉ. अब्दुल रशिद भट यांनी बाळाच्या मुख्य मेंदूला आलेल्या अन्य मेंदूचा भाग काढून टाकला.

या शस्त्रक्रियेसाठी तीन तास लागले. पाच हजार मुलांमध्ये अशा प्रकारचा आजार एखाद्याला उद्भवतो असे डॉ. भट यांनी सांगितले. इन्सेफलोसो आजारात मेंदूला लागूनच एक मांसाची पिशवी तयार होते. त्यात मेंदूच्या पेशींसारख्याच पेशी वाढू लागतात. महत्त्वाचे म्हणजे या मेंदूला टाळू नसतो. मूळ मेंदूपेक्षा या मेंदूची वाढ तिप्पट वेगाने होतेे. वेगाने वाढणाऱ्या मेंदूला मूळ मेंदूपासून विलग न केल्यास जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.