‘वृद्ध’ व्यक्तींच्या शिक्षेबाबत हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सासरी आलेल्या विवाहित स्त्रीचा मानसिक, शारीरिक छळ करणे अशा निंदनीय गुन्ह्यात केवळ वृद्ध असल्याने दया दाखविता येणार नाही. त्यामुळे गुन्हेगार केवळ वयोवृद्ध आहेत म्हणून शिक्षेत सुट दिली जाऊ शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी दिला आहे.

अकोला येथील सुनेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासू सासऱ्याच्या अपिलावर न्यायमूर्तींनी हा निर्णय दिला आहे. कौसल्या श्यामराव खेर्डेकर (वय ७३) आणि श्यामराव वामनराव खेर्डेकर (वय ७८) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबतची हकीकत अशी, खेर्डेकर यांच्या मुलाबरोबर मुलीचा १२ मे २००५ रोजी विवाह झाला. विवाहानंतर सासरी आलेल्या सुनेला आपला पती मानसिक आजारी असल्याचे कळले. तिच्यासाठी हा धक्का होता. या धक्क्यातून सावरत असतानाच तिला गर्भधारणेसाठी सासऱ्याशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला. त्यासाठी तिचा मानसिक छळ केला जाऊ लागला. मारहाणही होऊ लागली. तिला उपाशी ठेवले जाऊ लागले. त्यामुळे विवाहानंतर पाच महिन्यात तिने ६ ऑक्टोंबर २००५ मध्ये आत्महत्या केली. सत्र न्यायालयाने या दोघांना सप्टेंबर २००६ मध्ये ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते.

या अपिलात त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांच्या शिक्षेत सुट मिळावी अशी विनंती करण्यात आली होती. दोघे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या कारणावरुन त्यांची शिक्षा कमी केली जाऊ शकत नाही. त्यामुळे दोघांवर दया दाखविता येणार नाही असे न्यायालयाने नमूद करुन त्यांचे अपील फेटाळून लावले.

आरोग्यविषयक वृत्त –