वंचित आघाडीचा धर्म ज्यांनी पाळला नाही त्यांची हकालपट्टी : इम्तियाज जलील

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत अवघ्या काही महिन्यातच अस्तित्वात आलेल्या वंचित बहुजन आघाडीने भल्याभल्या उमेदवारांना धक्का दिला. परंतु याच वंचित बहुजन आघाडीत आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये काहींनी आघाडी धर्म पाळला नाही.

त्या कार्यकर्त्यांची आम्ही हकालपट्टी करणार हे नक्की आहे असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. सोलापुरात प्रकाश आंबेडकर विजय होतील याची आम्हाला खात्री होती. आता मी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करतो आहे. एमआयएमच्या ज्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात प्रकाश आंबेडकरांसाठी काम केलं नाही त्यांची हकालपट्टी केली जाईल हे निश्चित आहे असेही जलील यांनी म्हटले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने सोलापुरात जाऊन प्रकाश आंबेडकरांना मतदान करू नका आणि काँग्रेसलाही मतदान करू नका असं आवाहन केलं होतं. त्यामुळे सोलापुरात भाजपाचा विजय झाला. अप्रत्यक्षपणे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनेच भाजपाला मदत केली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचा बडा नेता कोण ते नाव मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे.

सोलापुर लोकसभा मतदार संघात प्रकाश आंबेडकर यांचा तिथे पराभव का आणि कसा झाला याचं चिंतन आम्ही करतो आहोत. असं जलील यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितले आहे.

Loading...
You might also like