रूग्णालयातील गैरसोयीमुळं नागरिकांनी आ. दत्तात्रय भरणेंसमोर वाचला तक्रारींचा पाडा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर उपजिल्हा रूग्णालय हे सध्या अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असुन या रूग्णालयात रूग्णांच्या सोयी सुविधांचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व रूग्णांच्या हालअपेष्टात मोठ्या प्रमाणात वाढ होत असुन रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक यांचा मनमानी कारभार याला कारणीभुत असल्याचे बोलले जात आहे. तर रूग्णालयात सुविधा मिळत नसल्याने रूग्णांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत असुन याबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षतेखाली इंदापूर उपजिल्हा रूग्णालय इंदापूर येथे तालुक्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधीकारी व नागरिक यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत तालुक्यातील पिडीत नागरिकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचेसमोर उपजिल्हा रूग्णालयात मिळत असलेल्या असुविधा बाबतच्या तक्रारीचा पाढाच वाचल्याने इंदापूर उपजिल्हा रूग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

याबाबतत इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांनी रूग्णालयात रूग्णांच्या समस्यांबाबत बैठकीत तक्रार मांडली. ते म्हणाले की इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात छोट्या, मोठ्या अशा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या या दवाखाण्यात केल्या जात नाहीत. त्या जाणीवपूर्वक टाळल्या जातात. त्यामुळे नागरिकांना खासगी दवाखाण्यात जावून शस्त्रक्रीया मोठ्या प्रमाणात पैसे घालवुन कराव्या लागत आहे. तर रूग्णांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी या ठीकाणी नाही. शौचालये व बाथरूम मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, काॅटवर रूग्णाला बेडशिट दिले जात नाही, इमर्जन्सी पेशंट बाहेरच्या बाहेरच इथे सुविधा नसल्याचे कारण देवुन बाहेर गावी घेवून जाण्यास सांगीतले जाते अशा अनेक समस्या मांडल्या.

रमेश शिंदे, गफुर सय्यद, बाळासाहेब ढवळे, सागर शिंदे यांचे सह अनेकांनी या बैठकीत आपल्या तक्रारी उपस्थित करून वैद्यकीय अधीक्षक मोरे यांना असुविधाबाबत जाब विचारला. त्यावेळी वैद्यकीय अधीक्षक मोरे यांना तक्रारींचा खुलासा करताना पळती भुई थोडी झाली. यावेळी पुणे विभागीय वैद्यकीय उपसंचालक संजय देशमुख यांनी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की इंदापूर उपजिल्हा रूग्णालय हे पहीले 50 खाटांचे होते. ते आता नविन बांधकाम व दूरूस्ती केल्याने सदर रूग्णांलय हे शंभर खाटांचे सुसज्ज असे झालेले आहे. परंतु या रूग्णालयात डाॅक्टर्स, स्पेशालिस्ट व कर्मचारी स्टाफ हा फार कमी आहे. त्यामुळे स्टाफच्या कमतरतेमुळे थोडीफार समस्या असल्यास त्याबाबतीत मी वैद्यकीय अधिक्षक मोरे यांचेशी चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

विठ्ठल ननवरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना वैद्यकीय अधिक्षक मोरे म्हणाले की जुनपासुन 44 छोटी मोठी ऑपरेशन्स इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आली असुन आणखी जी करण्यायोग्य आहेत अशी ऑपरेशन आजही आम्ही करत आहोत असे मोरे म्हणाले. तर डोळ्यांची ऑपरेशन्स नेहमी रूग्णालयात चालुच असल्याचे मोरे यांनी सांगीतले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी बोलताना रूग्णालयाशी संबधीत असणार्‍या सर्वांना आपआपली कामे जबाबदारीने व योग्यती काळजी घेवुन करण्याच्या सुचना दिल्या असुन कामात हयगय झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे सांगीतले.

तर इथुन पुढे उपजिल्हा रूग्णांलय इंदापूर वैद्यकीय अधिक्षक मोरे यांनी आपल्या कामाच्या शैलीत बदल करून कोणाचीही कसलीही तक्रार येणार नाही याबाबतची खबरदारी घ्यावी व आपले काम जबाबदारीने संभाळण्याच्या सुचना दिल्या. यावेळी रूग्णांलयाच्या वतीने आमदार भरणे यांचा हार व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात येणार होता परंतु भरणे यांनी हार फुलांचा सत्कार स्विकारण्यास नकार देवून रूग्णांलयातील सर्व तक्रारी ज्या दिवशी बंद होतील त्याच दिवशी मी हार फुलांचा सत्कार घेईन असे सांगुन सर्वांनी जबाबदारीने कामे करण्याच्या सुचना दिल्या.

यावेळी तहसिलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी परिट, वैद्यकीय उपसंचालक संजय देशमुख, सिव्हील सर्जन नांदापूरकर, मुख्याधिकारी प्रदिप ठेंगल, जि.प. सदस्य अभिजित तांबीले, जि. प. सदस्य बंडगर, डाॅ. एकनाथ चंदनशिवे, डाॅ. राजापूरे, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, शशिकांत तरंगे, नगरसेवक पोपट शिंदे, अनिकेत वाघ, स्वप्निल राऊत, अमर गाडे, बाळासाहेब ढवळे,अनिल राऊत, अमोल भिसे, प्रशांत शिताप, रमेश शिंदे, गफुर सय्यद,भाजप ता. अध्यक्षा रंजनाताई शिंदे,इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
Visit : policenama.com