चारा छावणीची कालबाह्य पद्दत बंद करण्यात यावी : अ‍ॅड. श्रीकांत करे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – सर्व जण डिजिटल इंडिया च्या मागे लागले असताना राज्यात जुनाट पध्दतीने चारा छावण्या सुरू ठेवून सरकारने या चारा छावण्या ह्या छळ छावण्या बनविल्या असुन त्या भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या असल्याचे मत पुणे जिल्हा शेतकरी सुकाणु समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत करे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

ते म्हणाले की चार्‍याचे अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करायला हवे होते. सध्या महाराष्ट्रातील दुष्काळ अंतिम टप्प्यात आहे. दुष्काळ हाताळण्यात शासन कमी पडले आहे. राज्याच्या अनेक भागात चारा छावणी जून मध्ये सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवार करून कर्ज काढून स्वतःची जनावरे जगवली आहेत त्याचा विचार करून नुकसान भरपाई ची रक्कम शेतकर्‍यांना मिळणे गरजेचे आहे.

 

सरकार डिजिटल धोरणाचा पुरस्कार करत असताना अजूणही जुनी चारा छावणी ची कालबाह्य पद्दत वापरत आहे. ही कालबाह्य पद्धत शासनाने बंद करून सर्व खर्च ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा.

पशु पालकांसाठी हा फार कठीण काळ आहे, यातच शासनाने चारा दावणीला देण्यापेक्षा छावणीला दिला आहे, काही ठिकाणी तर अजून काहीच उपाययोजना नाहीत, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असले तरी शेतकऱ्यांनी मात्र स्वतःची पशुधन वाऱ्यावर सोडले नाही याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. या चारा छावणीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होतात, एक तर दिवसरात्र तिथं एक माणूस गुंतून पडतो. त्यात कुटुंबातील वृद्ध, महिला व लहान मुले यांचा मोठ्या प्रमाणात भरणा असतो.कमावत्या व्यक्तीला सर्व कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी रोजंदारीवर कामाला जावं लागत.

शासनाने चारा दावणीला दिला तर तो शेतकरी आपल्या सोयीनुसार जनावरांना टाकू शकतो व त्यासाठी दिवस-रात्र राखण करण्याची वेगळी गरज नसते.परंतु छावणीला जनावर नेल्यावर मात्र त्या जनावराला राखण एक माणूस रात्रंदिवस ठेवावा लागतो. या ठिकाणी प्रचंड उकाडा मध्ये मुलं वृद्ध माणसं महिला यांना छोट्याशा आडोशाचा आधार घेऊन रहाव लागत. त्याचप्रमाणे बरीचशा चारा छावणीत तिथं यांच्या टॉयलेटची शौचालयाची सोय नसल्याने शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे श्रीकांत करे यांनी सांगीतले.

शिवाय जनावरे इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आल्यावर त्यांना वेगवेगळ्या साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण राबवावे लागते. शिवाय छावण्यांमध्ये होणारा भ्रष्टाचार पाहता चारा छावणी ही शेतकऱ्यांसाठी वरदान छावण्या न होता एक प्रकारच्या छळ छावण्या होऊ लागल्या आहेत.यासाठी शासनाने चारा दावणीला द्यायची व्यवस्था करावी.

अडचणीच्या काळात शासनाने शेतकऱ्यांचा मजबुरीचा फायदा न घेता, त्यांना सढळ हाताने मदत करण्याचा विचार करावा तसेच अनेक स्वयंसेवी संस्था ,कारखाने यांनी पुढे येऊन शेतकऱ्यांना चारा दावणीला द्यावा, व पशुपालक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर डायरेक्ट अनुदान जमा करावे व शेतकऱ्यांना चारा छावण्यांमध्ये लाचार बनवू नये असे मत अ‍ॅड श्रीकांत रामचंद्र करे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

You might also like