राज्यातील वाघ्या मुरुळी, लोककलावंतांची उपासमार, शासनाने मदत करावी : प्रा. मार्तंड साठे

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर होवून दोन महिने झाले असून , कुलाधर्म कुलाचारा बरोबरच देव,देश,व धर्मासाठी लोककलेची साधना करणारे वाघ्या मुरुळी व लोककलावंतांची उपासमार सुरु आहे. हि उपासमार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अन्नधान्याबरोबरच आर्थिक मदत द्यावी अशी मागणी वाघ्या मुरुळी परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांनी केली आहे.

वाघ्या मुरुळी हि एक लोककला आहे. या लोककलेचा विस्तार संपूर्ण राज्यभर झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार चारशे पेक्षा अधिक वाघ्या मुरुळीच्या ताफे कार्यरत आहेत.एका पार्टीत किमान आठ ते दहा कलावंत काम करीत असतात. साडेतीन शक्तीपीठासोबत बावन्नशक्तिपीठे ,अष्टभैरवनाथाचे भराड, तुळजाभवानीचा गोंधळ, मल्हारदेवाचे जागरण हे वाघ्या मुरुळी करीत असतात. कुलधर्म कुलाचारबरोबरच देव ,देश व धर्मासाठी कार्यरत असतात. लोककलेची साधना करून देवकार्याबरोबरच उद्बोधन, प्रबोधन,मनोरंजन तसेच स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि आता सरकारच्या ध्येय धोरणाला अनुसरून,लॉकडाऊनला साथ देवून घरातबसूनही कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी लोकगीतांचे माध्यम वापरत आहेत असे प्रा.मार्तंड साठे यांनी सांगितले.

गुढी पडावा, चैत्र,वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच कुलधर्म कुलाचाराप्रमाणे जागरण गोंधळाचे कार्यक्रम अडीच ते तीन महिने असतात.याच काळात मिळविलेल्या पैशावर मुलाबाळांचे शिक्षण व संपूर्ण प्रपंचाचा गाडा ,पोटपाणी चालत असते. मात्र कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच्या विळख्याने वाघ्या मुरुळी बेकार झाले आहेत.गेली दोन महिने काम नसल्याने त्यांची उपासमार सुरु आहे. हि उपासमार थांबविण्यासाठी शासनाने वाघ्या मुरुळीना अन्नधान्य द्यावे व त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी परिषदेचे अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे,राज्यमंत्री विश्वजित कदम, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.