शिरूर : हाॅस्पिटलमधील 18 जणांसह कुटुंबियांच्या 14 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल ‘निगेटिव्ह’

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन-  कारेगाव ता.शिरूर येथील ज्येष्ठ महिलेचा अहवाल कोरोना बाधित आल्याने बाबुरावनगरमधील उपचार घेतलेल्या हाॅस्पिटलमधील १८ जणांसह कुटुंबियांच्या १४ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र शिंदे व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी सांगितली.सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरासह तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
कारेगाव येथील ज्येष्ठ महिलेला छातीत दुखत असल्याने दि.९ रोजी शिरूर शहराच्या बाह्यमहामार्गालगत असलेल्या बाबुराव नगरमधील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यानंतर दुस-या दिवशी दि.१० रोजी पुढील उपचारासाठी नगर व त्यानंतर दि.१३ रोजी पुणे येथील खाजगी दवाखान्यात सदर महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पुणे येथे उपचार सुरू असताना तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना बाधित आला होता.दि.९ रोजी येथील बाबुराव नगरला सदर महिला उपचार घेत असताना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसुन येत नव्हते.त्यानंतर पाच दिवसांनी पुणे येथे उपचार सुरू असताना महिलेचा तपासणी अहवाल कोरोना बाधित आला होता.सदर महिलेला बाबुराव नगर येथील खाजगी दवाखान्यात एक दिवस उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याने या दवाखान्यातील १८ जणांची तपासणीसाठी स्वॅब पाठवण्यात आले होते.त्यातील १४ जणांचे अहवाल रविवार दि.१७ रोजी रात्री निगेटिव्ह आले होते तर उर्वरीत चार जणांचे व कुटुंबातील १४ जणांचे अहवाल मंगळवार दि.१९ रोजी निगेटिव्ह आले असुन बाधित महिलेच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र शिंदे व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी सांगितली.सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने शिरूरसह तालुक्याला दिलासा मिळाला आहे.