केडगाव ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटात रस्सीखेच! ग्रामसभेतील टाळ्या आणि उपसरपंचांच्या राजीनाम्याचे गूढ उकलेना

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) –  तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय रस्सीखेच सुरू आहे. या राजकीय रस्सीखेचेचे दर्शन नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत नागरिकांना पाहायला मिळाले आहे. या ग्रामसभेमध्ये सत्ताधारी गटाच्या सरपंचांवर सत्ताधारी गटातीलच काही मंडळींनी मोठ्या प्रमाणावर प्रश्नांचा भडिमार करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी विरोधकांची भूमिका अप्रत्यक्षपणे सत्ताधारी गटच बजावत असल्याचे दिसत होते.

यावेळी विरोधी गटाच्या लोकांना काही सत्ताधारी गटातील मंडळीच कानात काहीतरी सांगत मोठ्याने हसून टाळ्या देत असल्याचे पाहून सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु या सर्व गोंधळाचे कोडे आता हळू हळू उलगडत चालले असून ग्रामसभेत झालेला प्रकार हा एक प्रकारे दबाव तंत्राचा भाग असल्याचे आता नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत असून ग्रामपंचायत लेवलला केली जाणारी विकासकामे आणि त्याचा हिशोब यावरूनही मोठे रणकंदन माजवले गेले त्यामुळे आम्हालाही प्रक्रियेत घ्या नाहीतर सर्व पर्याय खुले असल्याचा निर्वाणीचा इशाराच जणू येथे देण्यात आला आहे.

उपसरपंच पदाचे राजीनामा गूढ आणि दबाव तंत्र..
सध्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावरून सत्ताधारी गटात दोन गट पडल्याचे दिसत आहे. उपसरपंच श्रीमती अनिता संपतराव शेळके यांनी गेल्या वीस दिवसांपूर्वी आपला ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला आहे अशी माहिती उपसारपंचांच्या गोटातून दिली जात आहे. परंतु हा राजीनामा ज्यांनी त्यांची उपसारपंचपदासाठी शिफारस केली होती त्यांच्याकडे दिला असल्याने तो शिफारसदारांकडून २० दिवस उलटले तरी अजूनही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे आला नसल्याने चर्चेला मोठे उधाण आले आहे.

भावी उपसरपंच पदासाठी तीनजण इच्छुक असल्याचे समजत असून यातील एकजनाचे नाव मागेच जाहीर झाले आहे परंतु सत्ताधारी दोन्ही गटांमध्ये आपल्या मर्जीतील उपसरपंच व्हावेत म्हणून सदस्यांची फोडाफोडी करण्याचीही व्यूहरचना आखण्यात येत असून जोपर्यंत भावी उपसरपंचांचे नाव जाहीर होत नाही तोपर्यंत विद्यमान उपसरपंचांचा राजीनामा अधिकाऱ्यांकडे पोहोच केला जाणार की नाही याबाबत नागरिकांमधून शंका उपस्थित केली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/