खडकवासला धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – खडकवासला धरण क्षेत्रामध्ये असणाऱ्या पाणी साठ्यातील वाटपात दौंड तालुक्यातील जनतेवर शेती आणि पिण्याच्या पाण्यामध्ये वर्षानुवर्षे अन्याय होत आलेला आहे त्यामुळे खडकवासला धरणातील हक्काचे पाणी दौंडकरांना मिळावे या मागणीसाठी दौंड मधील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दौंड तहसील कचेरीसमोर हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून महेश भागवत, सत्वशील शितोळे, अशोक फरगडे, पांडुरंग मेरगळ, निलेश म्हेत्रे हे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकरी या आमरण उपोषणाला बसले आहेत. तर या उपोषणकर्त्यांना भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक आनंद थोरात यांच्यासह तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.

खडकवासला प्रकल्पातील मुळ आराखड्याप्रमाणे दौंडला पाणी वाटप करावे, खडकवासला मुख्य कालवा, उपकालवा व चारी यांची दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करावीत, कराराप्रमाणे बेबी कॅनॉलच्या २७ फाट्या पर्यंत साडेसहा टीएमसी पाणी शुद्धीकरणकरून ते शेतीसाठी उपलब्ध करावे अश्या आशयाच्या मागण्या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी शासनाकडे केल्या आहेत.

खडकवासला धरणातील पाणी वाटप करताना दौंड तालुक्यातील जनतेवर अन्याय होत आलेला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील दौंडचे हक्काचे असणारे पाणी दौंडकरांना मिळाले पाहिजे या मागणीसाठी सोमवारी दि. १० जून रोजी सकाळी ११ वाजता दौंड तहसील काचेरीसमोर तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी आमरण उपोषनास बसले आहेत.

शहर – ग्रामीण वाद पुन्हा विकोपाला जाण्याची शक्यता
खडकवासला धरण प्रकल्प होताना दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी स्वतःच्या जमिनी दिल्या होत्या यातूनच धरण ग्रस्तांचे पुर्नवसन हे दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आले. यानंतर झालेल्या करारामध्ये खडकवासला धरणातील ११ टीएमसी पाणी पुणे शहराला ठरले होते परंतु सध्या पुणे शहर १८ टीएमसी पाणी बेकायदेशीरपणे वापरत असल्याने दौंड, इंदापूर आणि हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा पुणे शहर विरुद्ध पुणे ग्रामीण असा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हा वाद वाढू न देण्यासाठी मुळ आराखड्याप्रमाणे पाणी वाटप व्हावे याबाबत महेश भागवत यांनी बोलताना खडकवासला धरणातील मुळ आराखड्याप्रमाणे पाणी वाटप करावे, कोणत्याही घटकाने पाणी वाटप वाढवल्यास वाढीचे पाणी स्वत:च्या स्त्रोताव्दारे किंवा सरकारने उपलब्ध करावे. कराराप्रमाणे बेबीकॅनोलच्या २७ फाट्यापर्यंत ६.५० टीएमसी पाणी शुद्धीकरण करून उपलब्ध करावे. खडकवासला मुख्य कालवा, उपकालवा व चारी यांची दुरूस्तीची कामे तात्काळ पुर्ण करावीत व गळती रोखावी. उरुळी कांचन पर्यंत पाणी चोरी व गळती रोखण्यासाठी बंद पाईपलाइन द्वारे किंवा फुरसुंगी टनेलव्दारे एक्सप्रेस करावा. तसेच खडकवासला धरणातुन किंवा कालव्यातुन कुणालाही उचल पाणी परवानगी देऊ नये अशी मागणीबाबत माहिती दिली.