खाकाळ खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेप

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड जिल्ह्यात गाजलेल्या रवींद्र उर्फ बाळू खाकाळ खून प्रकरणात ५ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या दंडाची शिक्षी आज (मंगळवार) सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश दुसरे तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. गांधी यांनी ही शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मयत रवींद्र खाकाळ यांच्या पत्नीला देण्यात येणार आहे.

सचीन विठ्ठल सुर्यवंशी (रा. केरुळ), सय्यद गौस नुर (रा. नगर), भाऊसाहेब मोहन साबळे, महेंद्र सेवकराम महाजन, निंतीन संजय शिंदे अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. गाजलेल्या रवींद्र खाकाळ खून प्रकरणाची सुनावणी सोमवारी पूर्ण झाली. या खून खटल्यात दोषसिद्धी होऊन आज अंतिम निकाल देण्यात आला.

११ ऑक्टोबर २०११ रोजी केरुळ येथे रवींद्र खाकाळ यांचा राजकीय वैमनस्यातून यात्रेत तलवारीचे वार करुन खून करण्यात आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीतील भांडणातून हा प्रकार घडला होता. निवडणुकीत रवींद्र खाकाळ यांच्या पत्नी सरपंच झाल्या होत्या. त्यानंतर दोन गटांतील वाद पोलीस ठाण्यापर्यंतही पोचला होता. दरम्यान, रवींद्र खाकाळ हे केरुळ येथे बहिणीच्या गावी टेंभी देवीच्या यात्रेला गेले होते. देवीचे दर्शन घेऊन परतत असताना जीपमधून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर तलवारीने २९ वार केले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी खाकाळ यांचा भाचा प्रवीण गोंदकरने आष्टी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. याप्रकरणात १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुरुवातीला तत्कालीन उपअधीक्षक ज्योती क्षीरसागर व नंतर अपर पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश दुसरे तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. गांधी यांच्यासमोर सोमवारी आरोपींना हजर करण्यात आले. या खटल्याचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज पुन्हा न्यालयाचे कामकाज सुरु झाले. न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. फिर्यादी यांच्यातर्फे विशेष सरकारी वकील सय्यद अजर अली यांनी कामकाज पाहिले.