कोल्हापुर : ‘महाडिक-मंडलिक’ यांच्यात ‘झणझणीत’ चुरस ! मंडलिकांची ‘सरशी’ ?

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा २०१९ च्या निवडणुकांचा निकाल अगदी दोनच दिवसांवर येऊन ठेपला असताना आता अवघ्या देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. राजकीय तज्ञांनी आणि माध्यमांनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार देशात भाजप कडे जनतेचा कौल असेल असा अंदाज वर्तवला आहे. भाजपला ३०० जागांवर विजय मिळवता येईल असा अंदाज मध्यमांच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मतदार संघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात चांगलीच चुरस आहे. त्यामुळे येत्या २३ तारखेला क्षणाक्षणाला हार्ट बीट वाढवणारा निकाल कोल्हापूर मतदार संघाचा असेल आणि मंडलिकांची ‘सरशी’ होईल असे राजकीय तज्ञांचे मत आहे.

अंतर्गत गटबाजीचा महाडिकांना फटका ?

खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील हे वैर डोके वर काढत असल्याचे बोलले जात आहे. सतेज पाटील यांचा कोल्हापुरात चांगलाच दबदबा आहे. सतेच पाटील स्वतः जरी लोकसभेच्या रिंगणात नसले तरी मात्र आघाडीत असून देखील शिवसेनेला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. या गटबाजीचा फटका महाडिकांना बसू शकतो असे सांगण्यात येत आहे.

महाडिक-पाटील वादाचा फायदा शिवसेनेला ?

शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा बंटी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी उघड प्रचार केल्याचे समजते आहे. तसेच सोशल मिडियातही महाडिकांविरोधी पोस्ट व्हायरल केल्या. सतेज पाटील यांना मानणारा कोल्हापूर शहर व परिसरात मोठा वर्ग आहे. त्याचा फटका राष्ट्रवादीचे उमेदवार महाडिक यांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. सतेज पाटील दीड-दोन लाख मते युतीच्या पारड्यात टाकू शकतात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत याचा फटका महाडिकांना आणि राष्ट्रवादीला बसणार असल्याची जोरदार चर्चा कोल्हापुरात आहे.

महाडिकांना यांचा हात तारणार ?

धनंजय महाडिक यांना मानणारा एक मोठा वर्ग कोलहापुरात आहे. हा वर्ग कोल्हापुरात नेहमी सक्रिय असतो. तसेच धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक ह्या देखील सामाजिक कार्यात सक्रियरित्या सहभागी होत असतात. महिला बचत गट तसेच कोल्हापूरातील महिला वर्गासाठी विशेष काम त्यांनी केले आहे. त्याचा फायदा धनंजय महाडिक यांना होऊ शकतो असे देखील बोलले जात आहे.

You might also like