‘कोथरूड’मध्ये युवकांची भूमिका ठरणार निर्णायक !

भाजपमधील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील कलह, कुणाच्या पथ्यावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड विधानसभा मतदारसंघात यंदा युवकांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चिन्हे आहेत. विद्यमान आमदारांविरोधात ‘कोथरूडचा आमदार ; पण कोथरूडच निराधार’ हा प्रचार सुरु झाल्याने त्यात भाजपच्या अंतर्गत शह – काटशहाचे राजकारणही चव्हाटयावर आले आहे. दुसरीकडे या मतदारसंघावर पुन्हा कब्जा मिळविण्यासाठी शिवसेनेने रणनिती आखली असली तरी जनाधार लाभणार का हा प्रश्नही चर्चेला आला आहे. त्यात कोणतेही राजकीय पद आणि घराणेशाहीचा वारसा नसलेल्या कोथरूड विकास परिषदेच्या माध्यमातून सक्रिय असलेल्या एका नव्या चेहऱ्याला पोषक वातावरण बनले आहे. विशेषतः तरुणाईचा स्वयंस्फूर्तीने पाठिंबा पाहता या मतदारसंघातील समीकरणे बदलणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जीवघेणी वाहतूक, रस्त्यांची दुरावस्था, कचऱ्याचे साम्राज्य, नागरिकांच्या आरोग्याचा बिकट प्रश्न, एकाच उड्डाणपुलाचे दोन – दोन वेळा उदघाटन यासह यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था, स्वच्छतागृहांचा अभाव आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त असताना सत्ताधारी पक्ष मात्र केवळ प्रसिद्धीचा स्टंट करीत असल्याची तक्रार नागरिकांची आहे. विद्यमान आमदारांनी काय केले यापेक्षा त्या नागरिकांना भेटतात का असा सवालही नागरिकांचा आहे आणि स्थायी समितीच्या माध्यमातून पदे भोगुनही सत्ताधारी पक्षाने कोथरूडसाठी केले तरी काय ? हा जाबही विचारत आहेत. तर कोथरूड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी युतीच्या काळात शिवसेनेने कोणता आराखडा राबविला याकडेही लक्ष वेधले जात आहे.

यंदा या मतदारसंघातून ‘आमदारकी’साठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात इच्छुक असलेले भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दंड थोपटले आहेत तर शिवसेनेतून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यासह सेनेच्या आणखी एका इच्छुकाने भाजपविरोधात ‘सुरुंग’ पेरण्याचा पवित्रा घेतला आहे. साहजिकच सत्तेसाठी एकमेकात शह – काटशहाचे राजकारण पेटल्याने नागरिकांनी कोथरूड विकास परिषदेच्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क असलेल्या आशिष कांटे या उच्चशिक्षित तरुणाला कौल दिल्याचे चित्र आहे.

विशेषतः तरुणाईमध्ये ‘क्रेझ’ असलेल्या आशिष कांटे यांनी कोथरूड विकास परिषद आणि तारका फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वीच कोथरूड मतदारसंघात सर्व घटकांच्या हितानुसार सर्वांगीण विकासाचा आलेख कसा असावा यावर कार्य केलेले आहे. आणि एक आराखडा मांडलेला आहे, त्याकडे नागरिक एक ठोस पर्याय म्हणून आकर्षित झाले आहेत. परिणामी भाजपमध्ये उमेदवारीवरून होणारी रस्सीखेच, शिवसेनेत अंतर्गत कलह, राष्ट्रवादीची संभ्रमाची भूमिका या पार्श्वभूमीवर कोथरूड विकास परिषदेच्या रूपाने या मतदारसंघातील समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.

Visit : policenama.com