विधानसभा 2019 : युती झाल्यास कोथरूड कोणाकडे जाणार ? भाजपमध्ये रस्सीखेच ? ‘त्यांची’ उमेदवारीसाठी दावेदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड मतदारसंघ हा भाजप- शिवसेना युतीचा बालेकिल्ला. गेली अनेक निवडणुकांमध्ये विरोधकांना या मतदारसंघातून कायमच शिकस्तच खावी लागली आहे. पुर्वी युतीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपने स्वतंत्र लढत देत हा मतदार संघ मोठ्या मताधिक्याने ताब्यात घेतला. परंतू आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सध्यातरी पुन्हा युती होणार असल्याचे वातावरण दिसत असल्याने या मतदारसंघावरून भाजप व शिवसेनेमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची ताकद या मतदारसंघामध्ये पुर्वीपासूनच क्षीण राहीली आहे. तर काही वर्षांपुर्वी महापालिका निवडणुकीमध्ये आश्‍वासक मते मिळविलेल्या मनसेला या विरोधकांची साथ मिळाल्यास किमान आव्हान तरी राहील, अशी सध्याची परिस्थिती आहे.

भाजप शिवसेना युतीमध्ये पुर्वी कोथरूडचा समावेश असलेला शिवाजीनगर मतदारसंघ शिवसेनेकडे होता. दहा वर्षांपुर्वी पुर्नरचनेत कोथरूड आणि शिवाजीनगर असे दोन स्वतंत्र मतदारसंघ झाल्यानंतरही हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडेच होते. २००९ मध्ये शिवाजीनगर मतदारसंघामध्ये शिवसेनेचा पराभव झाला तरी कोथरूडमध्येच भगवाच फडकला. २०१४ च्या निवडणुकीमध्ये युती आणि आघाडी तुटली. त्यावेळी पंचरंगी निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रा. मेधा कुलकर्णी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या.

नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची पुन्हा शिवसेनेसोबत युती झाली. युतीचे उमेदवार गिरीश बापट यांना कोथरूड मतदारसंघातून एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि शिवसेनेची साथ यामुळे विधानसभेपेक्षा लोकसभेतील मताधिक्य ३० हजारांहून अधिक वाढल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. तसेच बापट यांचे शहर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसोबत असलेल्या संबधांचाही यामध्ये मोलाचा वाटा राहीला आहे. लोकसभेतील लाटेनंतर तर प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या इच्छुकांचे धाबे दणाणले असून त्यांच्याकडून कोणी फारसे इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.

मात्र, युतीमध्ये हा मतदारसंघ कोणाकडे जाणार यावरच विरोधी उमेदवार ठरेल, असे सध्यातरी पाहायला मिळते. या मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षांमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. आमदार आणि मतदारसंघातील बहुतांश पदाधिकारी, नगरसेवक यांच्यामध्ये सातत्याने कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. तर आमदार कुलकर्णी आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचेही फारसे सख्य नाही. अशा परिस्थितीत उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपमधूनच होवू लागली आहे. भाजपकडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ, सुशिल मेंगडे, अमोल बालवडकर हे प्रबळ दावेदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी खासदार अनिल शिरोळे यांची उमेदवारी बदलताना युवा चेहेरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांचे नाव अखेरपर्यंत चर्चेत होते. त्यामुळे विधानसभेतही उमेदवार बदलण्याचा निर्णय झालाच तर मोहोळ यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, पारंपारिक प्रतिस्पर्धी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सध्या तरी उमेदवार दिसत नाही. परंतू लोकसभा निवडकणुकीमध्ये उमेदवार उभे न करता दोन्ही कॉंग्रेसच्या पाठीशी राहीलेल्या मनसेची कोथरूड मतदारसंघामध्ये बर्‍यापैकी ताकद आहे. भाजपला पर्याय आणि किमान टक्कर द्यायची झाल्यास दोन्ही कॉंग्रेसकडून मनसेला पाठींबा दिला जावू शकतो, असे चित्र आहे. मनसेचे माजी नगरसेवक आणि दोनवेळा विधानसभा निवडणुक लढविलेले ऍड. किशोर शिंदे यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहीले जाते. युतीमध्ये कोणाच्या वाट्याला हा मतदारसंघ जाणार. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यास कोणाला उमेदवारी मिळणार, यावरच विरोधकांचे कोथरूड मतदार संघातील आव्हान स्पष्ट होईल? असे राजकिय पटलावरील चित्र आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like