‘कोथरूड’मध्ये नाराजांकडून ‘बेरजेचे समीकरण’, कुणाच्या पथ्यावर !

लोकग्रहास्तव कोथरूड विकास परिषदेचे आशिष कांटे निवडणुकीच्या रिंगणात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन टीम – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातल्या कोथरूड विधानसभा मतदार संघातील नाराज भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असला तरी पक्षाच्या पातळीवरच त्यांच्यावर निष्क्रियतेचा शिक्का बसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे. ‘ ताठ कणा, मराठी बाणा … आणि बाहेरून आमदार आणा’ या भाजपच्या प्रवृत्तीवर आता टीकेची झोड होत आहे. निष्प्रभ ठरलेल्या भाजपच्या इच्छुकांचे मनसुबे आता पाण्यात गेले असून शिवसेनेच्या इच्छुकांची संभ्रमावस्था पाहता या मतदारसंघात कोथरूड विकास परिषदेचे आशिष कांटे हे लोक आग्रहास्तव विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे स्पष्ट झाले आहे. कोथरूडचा नाही तर निदान पुण्याचा उमेदवार का नको, कशाला कोल्हापूरचा उमेदवार हवा अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत. भाजपच्या वर्तुळात पक्षासाठी त्यागाची भूमिका घेण्यामागे ‘विधान’परिषद असल्याची चर्चा आता खुलेआम होत आहे. मात्र नाराज झालेल्यांनी आता कोणत्याही स्थितीत ‘बाहेर’चा उमेदवार चालवायचा नाही यासाठी एकीची मोट बांधली आहे. कोल्हापूर पूर असो किंवा पुण्यातील पुरप्रसंगी गायब असणारा उमेदवार नागरिकांना कसा उपलब्ध होणार असा सवालही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये क्रेझ असलेल्या कोथरूड विकास परिषद व तारका फाऊंडेशनच्या माध्यमातून भरीव काम करणाऱ्या आशिष कांटे यांना कोथरुडकरांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह केला आहे.

उच्चशिक्षित आणि कोथरूड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा यापूर्वीच सादर करणाऱ्या आशिष कांटे यांनीही तयारी दर्शवून येत्या चार तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यात भाजपमधील नाराजांचा कल आशिष कांटे यांच्याकडे जाणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत असल्याने आशिष कांटे यांना पोषक वातावरण बनले आहे. परिणामी या मतदारसंघात सद्यस्थितीत दुरंगी लढत असल्याचेच चित्र आहे.

Visit : Policenama.com