नैताळे खरेदी-विक्री केंद्रावर ‘लिलाव’ शुभारंभ

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या द्राक्षे काढणी हंगाम जोरात सुरू असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणा-या द्राक्षेमण्यांना स्पर्धात्मक बाजारभाव मिळणेसाठी द्राक्षे उत्पादकांनी त्यांचे द्राक्षेमणी शिवार खरेदीद्वारे शेतावर विक्री न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी – विक्री केंद्रावरच विक्रीस आणावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य मोतीराम मोगल यांनी केले.

नैताळे व परीसरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीच्या तत्कालीन सदस्य मंडळाने दि. 28 मार्च, 2005 पासुन नैताळे येथे द्राक्षे हंगामात द्राक्षेमणी लिलावास सुरूवात केली होती. गेल्या 13-14 वर्षात या केंद्रास शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला असुन बाजार समितीच्या सदर उपक्रमामुळे शेतक-यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली आहे.

बाजार समितीने सदरचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यापुर्वी द्राक्षेमणी खरेदीदार थेट शेतक-यांच्या शेतावर जाऊन शिवार खरेदीद्वारे अत्यंत कमी भावात द्राक्षेमण्याची खरेदी करून वजनमापातही शेतक-यांची फसवणुक करीत असे. शिवाय सुरूवातीस काही रक्कम देऊन नंतर पैसे बुडविण्याचे प्रकार होत असे. सदर प्रकारांना आळा घालण्यासाठी बाजार समितीने शेतकरी हित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्षे हंगामात लासलगांव, उगांव, नैताळे व खानगांव नजिक येथे द्राक्षेमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नैताळे येथे दरवर्षी द्राक्षेमण्यांच्या खरेदी-विक्रीतुन मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. द्राक्षेमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षेमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षेमणी विक्री न करता सदर खरेदी – विक्री केंद्रावर द्राक्षेमणी विक्रीस प्राधान्य देतात असे मोगल यांनी नैताळे येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी सांगितले.

यावेळी मोगल यांचेसह इतर मान्यवरांच्या हस्ते द्राक्षेमणी क्रेटस् चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर संजय घुमरे यांचा द्राक्षेमणी रू. 25/- प्रती किलो या दराने विक्री झाला. याप्रसंगी बाजार समितीचे सदस्य वैकुंठ पाटील, नवनाथ बोरगुडे, अनिल सोनवणे, राजेंद्र बोरगुडे, आण्णासाहेब बोरगुडे, दत्तात्रय भवर, निफाड उपकार्यालयाचे प्रभारी दिनकर खालकर, द्राक्षेमणी खरेदीदार विष्णु गायकर, बापु धरम, अश्पाक शेख, खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी वाल्मिक (पप्पु) खालकर, वाल्मिक जाधव, रामनाथ गोळे यांचेसह परीसरातील शेतकरी उपस्थित होते.