लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाचा प्रश्न मार्गी, 85 लाखांचा निधी मंजूर

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघातील लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाच्या बांधकामास आराखड्यास शासनाची मंजुरी मिळाली असून या इमारतीच्या बांधकामास ८५ लाख रुपये निधीस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला लासलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन गृह इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

छगन भुजबळ यांच्या माध्यमातून लासलगाव येथे विविध सोयी सुविधायुक्त ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. या ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र्य शवविच्छेदन गृहाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. त्यामुळे छगन भुजबळ यांनी याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळ यांनी हा विषय प्राधान्याने मार्गी लावला आहे. लासलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाच्या बांधकामास शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी ८५ लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

लासलगाव येथे अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय असतांना या रुग्णालयात शवविच्छेदन गृहाच्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित होता. परिणामी लासलगाव परिसरातील मृत व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यासाठी निफाड ग्रामीण रुग्णालय किंवा नाशिक जिल्हा रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे लासलगाव ग्रामीण रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. याबाबतचा आराखडा देखील शासनाला सादर करण्यात आला होता. याबाबत छगन भुजबळ यांनी सूचना करून हा आराखडा तातडीने मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे शवविच्छेदन गृहाच्या इमारतीसाठी ८५ लक्ष रुपये निधीस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली असून लवकरच या इमारतीच्या बांधकामास सुरुवात होऊन येथील रुग्णालयात शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.