महापालिकेच्या प्रकल्प व आरक्षणाने बाधित नागरिकांना म्हाडाने थेट पद्धतीने घरे उपलब्ध करून द्यावीत : आ. लक्ष्मण जगताप

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – म्हाडाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांच्या वास्तव्यासाठी गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. या गृहप्रकल्पांमध्ये अत्यल्प व अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येणारी घरे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रकल्पाने बाधित, आरक्षणाने बाधित तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना थेट पद्धतीने उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी म्हाडाकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार जगताप यांनी म्हाडाच्या पुणे विभागीय गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे, “महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांसाठी घरांची निर्मिती केली जात आहे. घरांच्या निर्मितीसाठी काही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार ४ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम असलेल्या प्रकल्पांना २० टक्के जादा चटई निर्देशांक क्षेत्र (एफएसआय) वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. ती देत असताना अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना काही घरे राखीव ठेवण्याची अट घालण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये २० टक्के जादा एफएसआय वापरून उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांतील घरे बाधितांना उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यामुळे म्हाडाने अल्प व अत्यल्प उत्पन्न गटांसाठी राखीव ठेवलेली घरे महापालिकेच्या विविध प्रकल्पाने बाधित नागरिक, सार्वजनिक प्रयोजनाच्या आरक्षणाने बाधित नागरिक तसेच कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना थेट पद्धतीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.”

Visit : Policenama.com