धास्तावलेले आघाडीतील इच्छुक विधानसभेच्या ‘रिंगणा’तून आताच ‘बाहेर’ !

पुणे : पोलीसनामा ऑलनाईन [ विश्लेषण ] – लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या दणदणीत विजयाने शहरातील विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलल्याचे संकेत आहेत. परिणामी आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही या पेचात काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीतील इच्छुक अडकले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजपासाठी एकतर्फी ठरणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजप – महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दणदणीत विजय मिळवल्याने आणि देशात पुन्हा मोदी सरकार एकहाती आल्याने आता आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणार याची धास्ती पुणे शहरात आघाडीमधील इच्छुकांना लागली आहे.

गत लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनिल शिरोळे यांनी भरघोस मतदान मिळवताना कसबा मतदार संघ धुवून काढला होता तर ‘पर्वती’ने घसघशीत मतांची आघाडी दिली होती. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिवाजीनगरमध्येही भाजपाला मताधिक्य मिळाले होते. तर वडगावशेरीमध्ये आश्चर्यकारक आघाडी तसेच ‘लष्कर’मध्ये काँग्रेसची मते फिरविण्यात यश मिळाले होते आणि ‘कोथरूड’ने मोलाची कामगिरी बजावली होती.ही त्यावेळची स्थिती पाहता त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेने ‘होत्याचे नव्हते ‘असा कटू अनुभव आघाडीला आला आणि भाजपने निर्विवाद वर्चस्व शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात मिळविले . त्यात महापालिकेचीही सत्ता बहुमताने हस्तगत केल्याने काँग्रेसची वाताहत तर पुणे पॅटर्नचा प्रयोग करणाऱ्या राष्ट्रवादीला अस्तित्वाच्या लढाईपर्यंत भाजपने आणून सोडले.अनिल शिरोळे यांनी गत लोकसभा निवडणुकीत मतांचा जो विक्रम केला होता, तो यंदाच्या लोकसभेत गिरीश बापट यांनी मोडला आहे.

लोकसभेसाठी असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात गिरीश बापट यांना घसघशीत मते मिळाली आहेत. त्यामुळे या सर्व मतदारसंघावर आता भाजपचे वर्चस्व अबाधित झाले आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील स्थितीचा विचार केला तर भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांनी या मतदारसंघावर पकड असल्याचे दाखवून दिले आहे.तर ‘कोथरूड’मध्ये भाजपच्या प्रा. मेधा कुलकर्णी यांनी हा मतदारसंघ हा भाजपचाच यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. या मतदारसंघातून बापट यांना भरघोस मते मिळाली आहेत. ‘पर्वती’त तर लोकसभेच्या निकालाने काँग्रेस – राष्ट्रवादीला घरघर लावली आहे. जरी मतांची आघाडी रोखण्यात अल्प यश मिळाले असले तरी ती कुणी रोखली हा मुद्दा दोन्हीकडे संभ्रमावस्था निर्माण करणारा आहे. शिवाजीनगर मतदारसंघ जरी पूर्वी काँग्रेसचा होता तरी येथून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विजय काळे यांना आमदारकीची ‘लॉटरी’ सहजरित्या लागली होती.

या मतदारसंघात मतांचे ‘ गणित ‘ सांभाळण्यात आघाडीला काहीसे यश मिळाले असले तरी बापट यांना या मतदारसंघाने भरभरून मतदान दिले आहे. कॅंटोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसच्या मतांना सुरुंग लागल्याने येथे काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वास्तविक काँग्रेस विचारधारेला मानणारा सर्वधर्मीय मतदार हा गृहीत धरणे हेच महागात पडले आहे. कसबा मतदार संघ हा गिरीश बापट यांचा हक्काचा बालेकिल्ला असला तरी या मतदारसंघातून गत लोकसभेच्या मतदानानुसार यंदा ४ ते५ हजार मते बापटांना कमी मिळाली आहेत. त्यात यंदा मतदारांची संख्या वाढलेली होती, त्यातुलनेत येथून बापटांना मतांची आघाडी मिळणे आवश्यक होते. मात्र पक्षांतर्गत नाराजांना शह देताना स्थानिक विरोधकांची मोट बापटांनी बांधल्याने या मतदारसंघात काँग्रेस – राष्ट्रवादी यांनी मतांचा आलेख काही अंशी वाढू दिलेला नाही.

असे असले तरी गतवेळी मोदी लाट यंदा अनपेक्षित ‘सुनामी ‘ बनल्याने आता पुणे शहरात आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस -राष्ट्रवादीतील इच्छुकांसासाठी धोक्याची ठरणार आहे. त्यात महापालिकेतील भाजपची सत्ता आणि आठही मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचेच हे पाहता ,आगामी विधानसभा निवडणूकीचे आघाडीतील इच्छुकांचे स्वप्न भंगणारच आहे. त्यामुळे या सहाही मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी ‘गुडघ्याला बाशिंग ‘ बांधून तयार असलेल्या काँग्रेस – राष्ट्रवादीतील इच्छुकांनी आता मोजक्या समर्थकांसमवेत बैठक घेऊन ‘रिंगणा’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक या सहा विधानसभा मतदारसंघात एकतर्फी होणार अशीच चिन्हे आतापासून आहे. तर शिरूर लोकसभेत राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना हडपसर विधानसभा मतदारसंघाने मताधिक्य दिल्याने या मतदारसंघात भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे आगामी भवितव्य अधांतरी आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीतील इच्छुकांना आमदारकीसाठी संधी आहे. तर खडकवासला मतदारसंघात भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांना येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुन्हा शह देईल मात्र उर्वरित सहा मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व दिसणार नाही आणि राष्ट्रवादीही बाजी मारू शकणार नाही अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतून आतापासूनच इच्छुक ‘ आऊट’ झाले आहेत. तर काही मतदारसंघातून काही धनिक ‘आमदारकी’ लढविण्याची हौस पूर्ण करतील. त्यामुळे येणारा काळ हा आघाडीसाठी आतापासूनच धोक्याचा ठरला आहे.