‘या’ मतदान केंद्रांवर मतदार फिरकलेच नाहीत

श्रीनगर : वृत्तसंस्था – देशात दुसऱ्या टप्प्यात सर्वत्र ६० ते ७० टक्के मतदान होत असताना श्रीनगर लोकसभा मतदार संघातील ९० टक्के मतदान केंद्रावर एकही मतदार फिरकला नाही. काश्मीरमधील परिस्थिती गेल्या दोन तीन वर्षात खुपच बिघडली आहे. त्याचा परिणाम श्रीनगर लोकसभा मतदारसंघात दिसून आला. २०१४ मध्ये या मतदारसंघात २६ टक्के मतदान झाले होते. तेथे यंदा केवळ १४ टक्के मतदान झाले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सकडून माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अब्दुल्ला यांची लढत पीडीपीचे उमेदवार आगा सय्यद मोहसिन आणि भाजपचे खालिद जहांगीर यांच्याशी होत आहे. काँग्रेसने फारुक अब्दुल्ला यांना पाठिंबा दिला आहे.

श्रीनगर मतदारसंघात १२ लाख ९५ हजार ३०४ मतदार आणि १७१६ मतदान केंद्रे होती. श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचाच एक भाग असलेल्या गंदेरबल जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रावर एकाही मतदाराने मतदानासाठी हजेरी लावली नाही. बडगाम भागातील चडुरामध्ये ५ विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी ९.२ टक्के मतदान झाले तर चरार ए शरीफमध्ये सर्वाधिक ३१.१ टक्के मतदान झाले आहे.

सोनावर विधानसभा मतदार संघात फारुक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांनी मतदान केले. हा मतदारसंघ सोडल्यास इतर सातही विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी एकेरी आकड्यात झाली. ईदगाह विधानसभा संघात ३.३ टक्के, सोनावर येथे १२ टक्के मतदान झाले. या मतदान दरम्यान अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकांवर दगडफेकीच्या घटना घडल्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like