यंदा ‘या’ कारणामुळे वाढणार उमेदवारांची संख्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून आता तेथे शेवटच्या दिवशी कोण माघार घेतील, याकडे प्रमुख उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मात्र असे असले तरी वाढत्या उमेदवारांच्या संख्येमुळे निवडणुक अधिकाऱ्यांपासून ते प्रमुख उमेदवारांपर्यंत सर्वच हैराण झाले आहेत. गेल्या वेळेपेक्षा यंदा उमेदवारांच्या संख्येत चांगलीच भर पडली आहे. ही उमेदवारांची संख्या वाढण्यास काही प्रमाणात निवडणुक आयोगाचे धोरण कारणीभूत ठरले आहे.

अपक्ष उमेदवारांची संख्या वाढण्यामागे यंदा मतदान यंत्रावर उमेदवारांच्या नावाबरोबरच त्याचे छायाचित्र झळकणार आहे.
राज्यातील पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात तब्बल ११६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात सर्वाधिक ३० उमेदवार नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना लढत देत आहेत. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात माणिकराव ठाकरे आणि भावना गवळी हे लढत देत असून या मतदारसंघात २४ जण रिंगणात उतरले आहेत. अन्य मतदारसंघातही १३ ते १४ उमेदवार निवडणुक लढत आहेत.

लोकसभा निवडणुकीत अजिबात खात्री नसतानाही अनेक जण अपक्ष म्हणून वर्षानुवर्षे निवडणुक लढत असतात. निवडणुकीमार्फत आपले नाव लोकांपर्यंत पोहचते, म्हणून हे अपक्ष निवडणुक लढत असतात. यंदा उमेदवारांबरोबर त्यांचे छायाचित्रही मतदान यंत्रावर झळकणार आहे. फोटो काढण्याची हौस वाढली आहे. त्यामुळे आपला फोटो काही हजार रुपयांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात, किंवा शहरातील लोकांपर्यंत जात असल्याने स्वत:वर प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढून उमेदवारांच्या संख्येत भर पडली आहे.