‘मतमोजणी’साठी प्रशासन सज्ज ; पोलिसांचाही चोख बंदोबस्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी नगर एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या दोन वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये होणार आहे. गोडाउनमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा कक्ष राहणार आहेत. तसेच दोन मतदार संघासाठी प्रत्येकी 84 टेबल राहणार आहेत. पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. अधिकारी व कर्मचारी असा एकूण सातशे पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलावर प्रत्येकी एक मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. मतमोजणीसाठी एका मतदारसंघासाठी साडेसातशे कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी एकाच वेळी सुरु होणार आहे.

पावणेसहा वाजता उघडणार स्ट्राँगरुम

मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (दि.23) पहाटे पावणेसहा वाजता उमेदवारांच्या उपस्थितीत गोदामातील स्ट्रॉगरुम उघडून मतदान यंत्रे मोजणीसाठी बाहेर काढली जाणार आहेत. प्रारंभी टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. यामध्ये लष्करी जवानांकडून आलेल्या मतपत्रिकांचा देखील समावेश आहे. त्यानंतर ईव्हीएमच्या मतपत्रिका मोजण्यास प्रारंभ होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांतील मतांची मोजणी झाल्यानंतरच सर्वात शेवटी 30 मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटमधील चिठठ्यांची मोजणी होणार आहे.

आज मतमोजणीची रंगीत तालीम

आज सकाळी 10 वाजता नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणीची रंगीत तालीम सुरू झाली आहे. यासाठी दोन्ही मतदारसांसाठी नियुक्‍त केलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना उपस्थित राहाण्याचे आदेश दिले आहेत. नगर मतदारसंघातील रंगीत तालीम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे तर शिर्डी मतदारसांची रंगीत तालीम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

मतमोजणीसाठी सहा निरीक्षक

मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने नगर जिल्ह्यासाठी सहा निवडणूक निरीक्षक नियुक्‍त केले आहेत. प्रत्येक निरीक्षकाकडे दोन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. गोविंद जैस्वाल हे शिर्डी आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी असणार आहे. युवराज नरसिंहन यांची नियुक्‍ती नगर व पारनेरसाठी तर सी. अरविंद यांची नियुक्‍ती श्रीरामपूर व नेवासा विधानसभा मतदारसंघासाठी केली आहे. विरेंद्रसिंग बंकावत हे अकोले व संगमनेर, बालवानसिंग जागलान याची श्रीगोंदा व कर्जत- जामखेडसाठी तर सतीशकुमार शर्मा यांच्याकडे शेवगाव आणि राहुरी या दोन मतदारसांची जबाबदारी आहे.

आकडा जुळला नाही, तर व्हीव्हीपॅटची आकडेवारी अंतिम

नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघाच्या प्रत्येकी 30 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठठ्यांची मोजणी होणार आहे. व्हीव्हीपॅटमधील चिठठ्यांचा आकडा आणि ईव्हीएममधील मतांची संख्या याची पडताळणी केली जाणार आहे. दोन्हीचा आकडा समान येणे आवश्यक आहे. ईव्हीएमचा आकडा आणि व्हीव्हीपॅटचा आकडा जुळला नाही, तर व्हीव्हीपॅटच्या चिठठींचा आकडा अंतिम मानला जाईल.