विश्लेषणात्मक ! केंद्रात मजबूत सरकारसाठी दिला ‘कौल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्रमक प्रचार आणि काँग्रेस व विरोधकांचा विस्कळीतपणा यावरुन मतदारांनी हा कौल दिलेला दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने वर्षाभरापासून सुरु केलेली तयारी, योग्य नियोजन, भारतीयांची नस ओळखून वेळोवेळी केलेल्या घोषणा, त्याचबरोबर मिलावटी सरकार की मजबूत सरकार यावर दिलेला भर, त्यात सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा फायदा उठविण्याचा प्रयत्न करताना पाकिस्ताविषयी भारतीयांच्या असलेल्या तीव्र भावना यावर हळूवार फुंकर घालून त्याचे अंगारे फुलविण्याचा केलेला प्रयत्न या सर्वांचा परिपाक एक्झिट पोलमध्ये दिसून आला आहे.

एका बाजूला सुनियोजित व्युहरचना तर दुसरीकडे विस्कळीत असलेला काँग्रेस पक्ष व विरोधकांमध्ये नसलेले ताळमेळ हे जनतेला डोळ्यासमोर दिसत होते. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधक सत्तेवर आले तर दररोज एक पंतप्रधान करावा लागेल, याविषयी केलेली विनोदी टिप्पणी आणि लोकसभा निवडणुकीत तुम्ही खासदार नाही तर पंतप्रधान निवडून देत आहात, अशी लोकांना केलेले आवाहन महत्वाचे ठरले. नरेंद्र मोदी यांनीही तुमचे एक एक मत हे मोदींना जाणार असल्याचे प्रत्येक सभेत ठणकावून सांगितले. त्यामुळे आपण स्थानिक खासदारांला नाही तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मत देत आहोत, अशी भावना मतदारांमध्ये निर्माण करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे स्थानिक खासदाराने काम केले की नाही, हा रागलोभ मागे पडला.

भारतीयांच्या मनात पाकिस्तानविषयी एक तीव्र भावना आहे. निवडणुकांपूर्वी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याला हवाई दलाने दिलेले उत्तर याचाही मोठा वाटा असल्याचे जाणवते. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि भाजपने घेतला. पाकिस्तानला उत्तर द्यायचे तर त्यासाठी मोदींसारखा खमक्या पंतप्रधानपदी हवा हा विचार इतर सर्व नकारात्मक बाबींवर मात करुन गेल्याचे या एक्झिट पोलवरुन दिसून येते.

दुसऱ्या बाजूला काँग्रेस पूर्णपणे विस्कळीत होता. त्यांच्याकडे कोणतेही नियोजन नव्हते की भाजपाच्या आक्रमणाला कसे उत्तर द्यायचे याची कोणतीही तयारी केलेली दिसली नाही. कर्नाटकातील जनता दल सरकारच्या शपथविधीसाठी देशभरातील विरोधक एकत्र आले होते. पण, त्यांना एकत्र बांधून ठेवण्यात काँग्रेसला यश आले नाही.

दिल्ली काँग्रेसला आपबरोबर युती करण्यात अपयश आले. त्याचा फायदा भाजपाला झाल्याचे दिसून येते. एकट्या राहुल गांधी एकहाती प्रचाराची आघाडी सांभाळत होते. उत्तर प्रदेशात सपा बसपा महागठबंधनने भाजपाला घाम फोडला होता. असे असताना आपल्याला गृहीत धरले नाही म्हणून काँग्रेसने तेथे प्रियंका गांधी यांना उतरविले. प्रियंका गांधी यांना त्यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रात प्रचारासाठी उतरविले असते तर त्याचा अधिक फायदा झाला असता. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा फटका काँग्रेसला या राज्यात बसलाच पण उत्तर प्रदेशातही त्यांच्या हाती निराशाच आलेली दिसून येते. दुसरीकडे दिल्लीत आप चांगली लढत देऊ शकेल असे दिसत असताना तेथे मात्र प्रियंका गांधीच्या रोड शोचे आयोजन करण्यात आल. पण त्याचा काही फायदा झाला नसल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे.

या उलट उत्तर प्रदेशात अनेक एक्झिट पोलमध्ये या महागठबंधनला चांगल्या जागा दिल्या आहेत. वाराणसी या मतदारसंघात काँग्रेस व बसपा -सपा यांनी एकत्र येऊन एकच उमेदवार देऊ शकले नाहीत. तेथे काँग्रेसने महागठबंधनाला पुढे चाल दिली असती तर तेथे नक्कीच अधिक परिणाम झाला असता. भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्रमक प्रचार आणि काँग्रेस व विरोधकांचा विस्कळीतपणा हे पाहून मतदारांनी मोदींना अधिक पसंती दिल्याचे एक्झिट पोलवरुन दिसून येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like