‘त्या’ उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यावरून शिवसेनेतही २ गट ; हडपसर मतदारसंघात उमेदवारीवरून ‘रस्सीखेच’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लुल्लानगर येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे श्रेय घेण्यावरून शिवसेनेतही दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर मतदार शिवसेनेच्या वाट्याला आल्यास उमेदवारी वरून रस्सीखेच होण्याचे संकेत या घटनेवरून मिळत आहेत.

कोंढवा येथील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बांधलेल्या लुल्लानगर चौकातील उड्डाणपुलाचे रविवारी सकाळी पालकमंत्री आणि खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते उदघाटन झाले. या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्वच पक्षाच्या प्रतिनिधीना देण्यात आले होते. दरम्यान आदल्या दिवशी शिवसेनेचे शहर प्रमुख महादेव बाबर यांनी पुलाचे अनौपचारिक उद्घाटन केले. या उद्घाटनाला कोंढाव्यातील काही शिवसैनिक वगळता फारसे कोणी उपस्थित न्हवते. आपल्या काळात हा पूल मंजूर झाल्याचा दावा करत उद्घाटनाचा घाट घालण्यात आला.

मात्र वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे बोलले जात आहे. या पुलाला मंजुरी काही वर्षांपूर्वी मिळाली असली तरी लष्कराने कामाला परवानगी न दिल्याने काम सुरू होऊ शकले नव्हते. देशात आणि राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी या पुलास परवानगी दिली. यासाठी माजी खासदार अनिल शिरोळे, शिवाजी राव आढळराव पाटील, आमदार योगेश टिळेकर यांनी यासाठी पाठपुरावा केला.

विशेष असे की यासाठी निधीही दिला. त्यामुळे पुलाच्या कामाला गती मिळाली आणि पुलाचे काम झाले. त्यामुळे पालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला या पुलाच्या कामासाठी प्रयत्न केलेल्या सर्वच पक्षाच्या लोकरतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

या दोन्ही उदघाटनाच्या कार्यक्रमावरून शिवसेनेतच दोन अंतर्गत मतप्रवाह असल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांचा पराभव झाला असला तरी हडपसर मतदार संघाने त्यांना आघाडी मिळवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत.

अशा वेळी एका गटाने युतीचा धर्म पाळत वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी दुसरा गट मागील विधान सभेच्या निकालानंतर भाजपपासून अंतर राखत असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. युतीच्या जागावाटपामध्ये हडपसर मतदार संघ शिवसेनेकडे गेल्यास उमेदवारी देताना या घटनांचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा हडपसर शिवसेनेत सुरू झाली आहे.