काँग्रेसच्या 22 बंडखोर माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, ज्योतिरादित्यांसह अनेक नेते उपस्थित

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेश कॉंग्रेसमधून राजीनामा देणारे सर्व आमदार शनिवारी बंगळूरहून दिल्लीला पोहोचले. जेपी नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज २२ आमदारांनी भाजपची सदस्यता ग्रहण केली. भाजप अध्यक्षांनी सर्व आमदारांना पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया, नरेंद्रसिंग तोमर, विनय सहस्त्रबुद्धे हे नेते उपस्थित होते. हे तेच आमदार आहेत, ज्यांच्या राजीनाम्याने मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पडले.

शुक्रवारी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतरच बंगळुरुमधील सर्व माजी आमदारांना बोलविण्याची तयारी सुरू झाली आहे. अखेर शनिवारी बंगळुरुच्या रामदा रिसॉर्टमधील सर्व आमदार खास विमानाने दिल्लीला पोहोचले. या आमदारांच्या राजीनाम्यानंतर राज्यात पोटनिवडणूकही होणार आहे. नुकतेच २२ आमदारांनी राजीनामा दिला असून दोन जागा आधीच रिक्त आहेत. अशा परिस्थितीत राज्यात एकूण २४ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. कमलनाथ सरकार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या आमदारांना भाजपा तिकीट देऊन निवडणुकीत उतरवणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत आता कॉंग्रेसचे हे सर्व बंडखोर नेते आपल्या भागात कामाला लागणार आहेत.

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा आता सरकार बनविण्याचा दावा करेल. तथापि, भाजपाचे विचारमंथन चालू आहे की सरकार स्थापनेचा दावा कधी करावा. दाव्यापूर्वी भाजप विधिमंडळ पक्ष बैठक होणार असून त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरविण्यात येईल. मात्र, शिवराजसिंह चौहान हे विधिमंडळ पक्षाचे नवे नेते असल्याचे मानले जात आहे.

नंबर गेममध्ये भाजपा अव्वल

कॉंग्रेसच्या सर्व २२ बंडखोरांच्या राजीनाम्यानंतर भाजप संख्याबळातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यात १०६ आमदार आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसकडे सभापतींसह फक्त ९२ आमदार आहेत. कॉंग्रेसजवळ अपक्ष आणि बसपा-सपाच्या ७ आमदारांचा पाठिंबा देखील आहे. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा १०३ आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपवर लोकशाही मूल्यांची हत्या केल्याचा आरोप लावला आहे.

जनतेसमोर आपली बाजू मांडून दिला राजीनामा

शुक्रवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर लवकरच कमलनाथ यांनी राजभवन गाठले आणि राज्यपालांना आपला राजीनामा सादर केला. याआधी कमलनाथ म्हणाले, मागील विधानसभेचा निकाल ११ डिसेंबर २०१८ रोजी आला होता, कॉंग्रेसने जास्त जागा जिंकल्या हे स्पष्ट झाले. मी १७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि २५ डिसेंबरला मंत्रिमंडळ स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आज २० मार्च आहे, गेल्या १५ महिन्यांत राज्याला नवीन दिशा देण्याचा माझा प्रयत्न आहे. राजीनामा देण्यापूर्वी कमलनाथ यांनी आपल्या सरकारच्या कर्तृत्वाची नोंद केली. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफी, युवा रोजगार, राज्यात गुंतवणूकीचे वातावरण निर्माण करणे आणि स्वस्त वीज या प्रमुख गोष्टी होत्या.