मुलांचे कौतुक करायचे राहून गेले ! महाराष्ट्र आणि कामगार दिनाविषयी आदरभाव कायम

पुणे : प्रतिनिधी – भल्या पहाटे गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय जय महाराष्ट्र गीत ऐकू आले नाही, त्यामुळे काही तरी चुकल्यासारखे झाले. रस्तोरस्ती तिरंगा घेऊन विकणारे चिमुकले हातही कुठे दिसले नाहीत. भल्या पहाटे उठून पटापट तयार होऊन शाळेत जायचे, रांगोळी काढायची, तिरंगा फडकावयाचा, कवायती, परेड, महाराष्ट्र गीत, खणखणीत आवाजातील भाषणे, तर कुठे बोबडे बोल, असा काही महाराष्ट्र दिनाचा थाट पाहायला मिळाला नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. महाराष्ट्र आणि कामगार दिनाविषयी आमच्या मनात आदराची भावना कायम आहे. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी आम्ही सारे सहन करू, अशीच भावना तळागाळातून ऐकू येत होती.

सर्वच शाळांमध्ये नटून-थटून आलेली चिमुकली, त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, निकालाविषयीची उत्सुकता, असे चित्र दरवर्षी ‘महाराष्ट्र दिनी’ म्हणजे १ मे या दिवशी दिसते. यंदा मात्र करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र दिनी’ शाळेमध्ये ध्वजवंदन करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘ना ध्वजवंदन, ना निकाल’, अशी परिस्थिती शाळांमध्ये होती. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर पहिलीवहिल्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शाळा बंद राहिल्याची हूरहूर सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली.

दरवर्षी साधारपणे १४ एप्रिलपर्यंत शाळेतील मुलांच्या परीक्षा संपतात आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात. यावर्षी मात्र काहीसे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 22 मार्चपासून सर्वच शाळा-महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्या. त्यामुळे परीक्षा नाही, आणि १ मे च्या दिवशी शाळेमध्ये ध्वजवंदनासाठी तसेच निकालपत्रक घेण्यासाठी विद्यार्थी शाळेमध्ये दिसले नाहीत. नाही, तर ध्वजवंदन झाल्यानंतर मुलांना निकालपत्रक वाटप केले जाते. आपल्या मित्राला किती गुण मिळाले, वर्गात प्रथम क्रमांक कोणाचा आला, कोणत्या विषयामध्ये कोणाला किती गुण आहेत, अशा चर्चा शाळांध्ये विद्यार्थी तसेच पालकांमध्ये सुरू असते. शिक्षकसुद्धा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करतात. कमी गुण मिळाल्यांना पुढच्या वर्षी मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला देण्यात येतो. पास झाल्यावर, चांगले गुण मिळाल्यावर पेढेसुद्धा काही पालक वाटत आपल्या मुलांना प्रोत्साहन देत असतात. मात्र, शाळा बंद असल्याने ना निकाल, ना पेढे, ना कौतुक अशी स्थिती आज पाहायला मिळाली.

यंदा कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा मार्च महिन्यातच बंद करण्यात आल्या आहेत. मुलांच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनाचा कार्यक्रम न घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच महाराष्ट्र दिनी शाळेमध्ये कोणाचीही उपस्थिती नसेल. त्यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे तर काही विद्यार्थ्यांमध्ये काहीसे निरूत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान, करोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने देशभर ‘लॉकडाउन’ आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन करण्यात येऊ नये, असे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना महाराष्ट्र दिनी शाळेत ध्वजवंदन करू नये, असे आदेश दिले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांना तसे पत्रही पाठवले आहे.