नागरिकाच्या सतर्कतेमुळं माजलगावात पोलिसांनी ‘उधळला’ बालविवाहचा ‘डाव’ ! 6 जणांविरुद्ध FIR

माजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील आयशा नगर (फुलेनगर) भागात रविवारी रात्री 11 वाजता एका 9 वर्ष वयाच्या बालिकेचे लग्न लावल्या जात असल्याचा डाव माजलगाव पोलिसांनी एका सुज्ञ नागरिकाच्या माहितीवरून उधळून लावला. मुलीच्या आईला 30 हजार देऊन 9 वर्षाची मुलगी विकत घेऊन हा विवाह कशासाठी लावण्यात आला ? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला असून हा बालविवाहच ! का नरबळी ? आशा शंका-कुशंका चे पेव शहरात फुटले आहे. दरम्यान सहा आरोपींविरोधात माजलगाव शहर पोलिसात बालविवाह कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी अटक केले असून तपासाअंती या प्रकरणाला अनेक पैलू फुटणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मंगलाबाई रामेश्वर शिंदे रा. फुलेनगर दिपाली नागोराव डाके रा. फुलेनगर आयोध्या अंगद जाधव रा. आयशा नगर आशामती दिलीप घोलप रा. फुलेनगर या सर्व जनी खाजगी इलाजा निमित्त केज तालुक्यातील राखाचीवाडी येथे दि. 4 रोजी गेल्या होत्या. (याठिकाणी येणाऱ्या श्रध्दाळूला राख देऊन इलाज करण्यात येत असल्याचे सांगितले जाते) या ठिकाणी त्यांची भेट राखाची वाडी येथील 60 वर्षीय महिला उर्मिला दिनकर यादव यांच्याशी झाली. यावेळी या महिलेने मंगलाबाई शिंदे व आशामती दिलीप घोलप यांना सांगितले की आमच्याकडे मुलगा आहे तुमच्याकडे कोणी मुलगी असेल तर पहा.

त्यावेळी आशामती घोलप यांनी सांगितले की माझ्याकडे मुलगी आहे परंतु ती 9 वर्षाची लहान आहे. माझी तिचे लग्न करण्याची ऐपत नाही. तुम्ही 30 हजार रुपये देत असाल तर मी माझी मुलगी तुमच्या मुलासोबत लग्न लावून देते. त्यावेळेस मुलाची आई उर्मिला यादव या 20 हजार रुपये देते म्हणाल्या. नाही/व्हय करत हा सौदा 30 हजारात ठरला. त्यानुसार उर्मिला यादव यांनी आपला वर मुलगा संतोष बारीकराव यादव (वय 20 वर्ष) व अजिमोदिन गणी शेख रा.राखाचीवाडी हे माजलगाव येथे मंगलाबाई शिंदे यांच्या फुलेनगर येथे दि.10 रोजी घरी आले. यावेळेस त्यांनी आपल्या एकदरा येथील मित्र जफर इस्माईल सय्यद यांना बोलावून घेतले. दिवसभर हे या ठिकाणी थांबले. लग्नाचे साहित्य जमा केले. रात्री 11 वाजता या ठिकाणी लग्न लावण्याचा बेत आखला. परंतु येथील एका नागरीकाच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती कळवली.

दरम्यान यावेळी पोलिसांनी धडक कारवाई करून हा घडून येत असलेला बालविवाह उधळून लावला. व संबंधित सहा लोकांना ताब्यात घेतले. तीस हजारात नऊ वर्षाची मुलगी विकत घेऊन लग्न लावण्याचा घाट कशासाठी करण्यात आला. असा प्रश्न यानिमित्त पडला आहे. या घटनेची पाळेमुळे राखाचीवाडी सि जोडले गेल्याने हा बालविवाहच ! का नरबळी ? आशा शंका-कुशंका चे यानिमित्ताने शहरात पेव फुटले आहे. या सर्व प्रश्नाचे कोडे पोलिसांच्या तपासात उलगडणार आहे. दरम्यान आरोपी उर्मिला दिनकर यादव, संतोष बारीकराव यादव, आशामती दिलीप घोलप, मंगलाबाई रामेश्वर शिंदे, अजिमोदिन गणी शेख, जफर इस्माईल सय्यद या सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. निरीक्षक नीता गायकवाड, ज्योती कापले, सुंदर पवार, किशोर राऊत, अविनाश राठोड हे करत आहेत.

Visit : Policenama.com