मांजरी बुद्रुक येथील गायरानावरील अतिक्रमणावर कारवाई, तीन एकर क्षेत्र झाले मोकळे

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – मांजरी (बु) ता. हवेली येथील गायरानावरील अतिक्रमणावर महसूल व ग्रामपंचायत कार्यालयाने कारवाई करत, सुमारे तीन एकर क्षेत्र मोकळे केले आहे. आणखी पंधरा ते वीस पत्राशेड बाकी असून येथे राहणाऱ्यांनी चार ते पाच दिवसात स्वत: हून काढून घेण्याची तयारी दाखवली आहे. असे थेऊरच्या मंडलाधिकारी गौरी तेलंग यांनी तहसीलदार हवेली यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

पुणे शहरापासून जवळच असलेल्या मांजरी बु.येथील स.न.159 ई या क्षेत्रात अनेकांनी अतिक्रमण करुन झोपड्या उभारल्या होत्या. हा सर्वे नंबर गायरान असल्याने शासनाच्या विविध समाज उपयोगी योजना राबविण्यासाठी काही क्षेत्र देण्यात आले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून उर्वरीत भागामध्ये झोपडपट्टीत वाढ झाली. यावर अनेक तक्रारी दाखल झाल्या वर हवेलीचे नायब तहसीलदार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली व पाहणी करून संपूर्ण अहवाल कार्यालयात सादर केला.

त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने संबंधित अतिक्रमण धारकांना तीन नोटीस बजावण्यात आल्या परंतु याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यावर हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय व महसूल विभाग यांनी हडपसर पोलिस स्टेशनला पत्र देऊन पोलिस संरक्षण घेऊन येथील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. थेऊरच्या मंडलाधिकारी गौरी तेलंग तसेच गाव कामगार तलाठी कोतवाल ग्रामपंचायतीचे 40 कर्मचारी हडपसर पोलिस असा लवाजमा घेऊन सुमारे तीन एकर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यात आले, तर आणखी पंधरा ते वीस पत्रा राहिलेले आहेत तेथील रहिवाशांनी चार दिवसाचा कालावधी मागितला आहे. कारण घरात लहान मुले महातारी माणसं तसेच गर्भवती महिला असल्याने माणुसकीच्या दृष्टीकोनातून ही सवलत दिली आहे.