मराठी चित्रपट अटकेपार नेणारा अवलिया … मुख्यमंत्र्यांनीही पत्राद्वारे केले ‘कौतुक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – (प्रेरणा परब -खोत)- चित्रपट हे असे एक प्रभावी माध्यम आहे ज्याद्वारे आपण आपली भाषा, आपली संस्कृती,आपलं ज्ञान , आपलं मत जगासमोर मांडू शकतो. भारतीय चित्रपटांनी जगभरात आपली एक वेगळीच ओळख निर्मण केली आहे. यात मराठी चित्रपट देखील काही कमी नाही. जगभरातील चित्रपटांच्या गर्दीत आपलं स्थान पक्कं करण्यासाठी मराठी चित्रपटही धडपड करतोय… या सगळ्यात मराठी चित्रपटाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी एक तरुण अविरत धडपड करीत आहे. त्याचं नाव म्हणजे ‘अक्षय इंडीकर’. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्याचा ‘स्थलपुराण’ नावाचा मराठी चित्रपट प्रसिद्ध जर्मनीच्या  बर्लिन आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  झळकत आहे. बर्लिन चित्रपट महोत्सवाला खूप मोठे स्थान आहे. २० फेब्रुवारी ते १ मार्च या वेळेत हा महोत्सव पार पडणार आहे. एवढंच नाही तर त्याच्या या चित्रपटाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अक्षयला कौतुकाची थाप दिली आहे. अक्षयला अभिनंदन करणारे पत्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मिळाले आहे.

 

मूळ सोलापूरचा असणाऱ्या अक्षयने आपले कॉलेजचे शिक्षण पुण्यातच पूर्ण केले एकूणच चित्रपट क्षेत्रात रस असल्याने पुण्यातील (FTII) मध्ये पुढचे शिक्षण घेतले. मराठी साहित्याचे उर्ध्वयू भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनावर आधारित असलेला उदाहरणार्थ नेमाडे आणि लहान गावातून मोठ्या शहरात आलेल्या संवेदनशील तरुणांच्या मनोविश्वावर  आधारित ‘त्रिज्या’ या दोन सिनेमांनंतर येणारा हा ‘स्थलपुराण’ सिनेमा संजय शेट्ये निर्मित विन्सन प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे.

आठ वर्ष वय असलेल्या दिघू या मुलाचे शहरातून आपल्या आई आणि बहिणीसोबत अचानक कोकणातल्या एका लहान गावात झालेले स्थलांतर , गर्द पाऊस आणि रोरावणाऱ्या समुद्राची उत्कट आणि उदास पार्श्वभूमी, आणि भवतालच्या साऱ्या गलबलाटात अचानक अदृश्य झालेल्या आपल्या वडीलांचा शोध असे मध्यवर्ती कथानक असलेला हा सिनेमा जगभरातल्या सिनेरसिकांच्या मनावर विशिष्ट परिणाम सोडल्यावाचून राहणार नाही.मराठी सिनेमाला आलेलं साचलेपण आपल्या सिनेमातून प्रवाही करण्याचं काम अक्षय इंडीकर अतिशय मेहनतीने करत आहे.त्यामुळे बर्लिनमध्ये प्रदर्शित होणारा ‘स्थलपुराण’ मराठी सिनेमाचा डंका अटकेपार वाजवत असल्याचाच हा पुरावा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यापूर्वी बर्लिन चित्रपट महोत्सवात सामना, विहिर, किल्ला आणि सैराट हे चारच मराठी चित्रपट झळकले होते.

 

खरी निर्मिती ही मातृभाषेतच होते

मराठी बाबत बोलताना अक्षय म्हणतो, मराठीत सिनेमा करण्याचं कारण असं आहे की, तुमची जी खरी निर्मिती आहे ती तुमच्या मातृभाषेत होते. सिनेमा जर स्वप्नासारखा असला पाहिजे, अंतरंगात डोकावणारा असला पाहिजे तर तुम्ही ज्या भाषेत स्वप्न बघता, त्या भाषेत तुमची कलाकृती असली पाहिजे. असं अक्षय इंडीकर याने बोलताना सांगितलं तसेच जगभरासोबत महाराष्ट्रात आता स्थलपुराण हा चित्रपट दाखवण्यासाठी उत्सुक असल्याचंही  म्हणलं.

मुख्यमंत्र्यांचं पत्र

अक्षयला मुख्ययमंत्री कार्यालयातून मिळालेल्या पत्रावर १३ फेब्रुवारी २०२० ची तारीख आहे. मुख्यत्र्यांनी या पत्रात अक्षयचे कौतुक करताना म्हंटले आहे की , ” चित्रपट हे माध्यमच नवीन्यपूर्णतेची  ओढ असलेले क्षेत्र आहे.  त्यामध्ये तुम्ही रुळलेली वाट न चोखाळता तुमची वैशिष्ट्ये  मराठी चित्रपटाच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचविणे कौतुकास्पद आहे. पदार्पणातच आपल्या ‘त्रिज्या’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकने मिळाली.  आता ‘स्थलपुराण’ हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला आहे.  मराठी चित्रपटांविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुतूहल राहिले आहे.  यात असे दर्जेदार मराठी चित्रपट झळकणे,  मराठी चित्रपट सृष्टीसाठी गौरवास्पद बाब आहे.  या यशासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा” असे अक्षयला मिळालेल्या पात्रात नमूद करण्यात आले आहे.

जगभरातल्या बहूभाषीक सिनेरसिकांकडून आणि सिनेदिग्दर्शकांकडून कौतुकाची थाप मिळालेल्या अक्षयची ओळख अतिशय व्यापक आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून हळूहळू देशभरात निर्माण होत आहे.