औषधांच्या घाऊक बाजारातील ‘कोरोना’ प्रादुर्भावाला स्थानिक प्रशासनच जबाबदार : रमेश अय्यर

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन –  औषधांच्या घाऊक बाजारात कोरोना रुग्ण आढळला. एक, दोन नव्हे तर ३४ रुग्ण आढळले याला स्थानिक प्रशासन जबाबदार आहे असा आरोप काँग्रेस पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस आणि प्रवक्ते रमेश अय्यर यांनी केला आहे.

औषधांचा घाऊक बाजार पेठेतील मध्यवस्तीत आहे. त्या ठिकाणी दुकानदारासह ३४ जणांना कोरोनासंसर्ग झाल्याने परिस्थिती बिकट झाली. तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवावी लागली. याबाबत बोलताना अय्यर म्हणाले, पुणे शहरात सुमारे सहा हजार औषध विक्रेते आहेत. ते सर्वजण याच बाजारपेठेतून वेगवेगळ्या औषधांची खरेदी करतात. प्रत्येक वितरकाकडे सहा जणांचा स्टाफ आहे. या बाजारपेठेत किरकोळ खरेदीदार, डिलिव्हरी बॉईज, औषधांच्या कंपन्यांचे प्रतिनिधी यांची सतत वर्दळ असते. मालाची वाहतूक करणारे टेम्पो चालक, त्यांचे सहाय्यक यांचीही त्या वर्दळीत भर पडते. ही बाजारपेठ रहिवासी वस्तीत आहे हे लक्षात घेऊन टाळेबंदी जाहीर झाल्यावर प्रशासनाने तातडीने नियोजन करणे आवश्यक होते.

टाळेबंदीच्या सुरुवातीला या दुकानांची वेळ सकाळी दहा ते दुपारी बारा अशी अवघी दोन तासांची ठेवल्याने गर्दी होत राहिली. विक्रेत्यांची गैरसोय झाली. त्यानंतर दुकानांची वेळ दहा ते दोन अशी केली परंतु उपनगरातील विक्रेत्यांना दहा ते बारा या वेळातच दुकाने उघडी ठेवता येत होती. अन्यथा पोलीसांचा त्रास व्हायचा. त्यामुळे ते बाराच्या आतच सर्व व्यवहार उरकायला बघायचे परिणामी परत दोन तासांच्या वेळात गर्दी होऊ लागली. त्याचा व्हायचा तो दुष्परिणाम झाला. ३४ जणांना कोरोनाची लागण झाली. या घाऊक बाजारातले डिलिव्हरी बॉय माल पोहोचविण्याच्या निमित्ताने अनेकांच्या संपर्कात आले आहेत त्यामुळे या संसर्गाची व्याप्ती वाढू शकते. नियोजन नसल्याने हे सगळे घडले. त्याला स्थानिक प्रशासन जबाबदार आहे असे अय्यर यांनी सांगितले.

बाजारपेठेसाठी महापालिका नियमावली करणार आहे. त्यात या दुकानांसाठी वेळ वाढवून द्यावी, शहराचे विभाग पाडावेत आणि त्याप्रमाणे विक्रेत्यांना वार ठरवून द्यावेत. परिणामी गर्दी टाळणे शक्य होईल अशी सूचना अय्यर यांनी केली.