काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांचे विरोधी पक्षनेत्याबाबत सूचक विधान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कोण कोणत्या उमेदवाराचा प्रचार करीत आहे, याची माहिती पक्षश्रेष्ठींना समजलेली आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सूचक विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय कार्यकारणी सदस्य आ. बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत बोलताना केले.

नगर येथील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील कार्यकर्ते कुणाचा प्रचार करीत आहेत, हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे. पक्षश्रेष्ठी त्याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेतील, अशी आशा आहे. आघाडीचा धर्म पाळून नगरच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जेथे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, तिथे राष्ट्रवादीचा काँग्रेस व काँग्रेसचा जेथे उमेदवार असेल, तिथे काँग्रेसचा प्रचार करून देशभरात काँग्रेस आघाडीचे व त्या विचारांचे सरकार यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही थोरात म्हणाले.

…म्हणून बदलले जिल्हाध्यक्ष

नगर जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब शेलार यांच्याऐवजी करण ससाणे यांच्या नियुक्तीबाबत बोलताना आ. थोरात म्हणाले की, पक्षाचा कोण कार्यकर्ता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याचा दावा करून भाजपचा प्रचार करीत असेल, तर पक्ष ते मान्य करू शकत नाही. त्यामुळेच पक्षांनी युवा असलेल्या करण ससाणे यांची नियुक्ती केलेली आहे. हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे तो योग्यच आहे.