भाजप आमदाराच्या दोन बायका अन् फजिती ऐका ; आ. राजू तोडसाम पुन्हा अडचणीत

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – दोन बायका आणि फजिती ऐका अशी गत भाजपचे आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांची सध्या झाली आहे. या दोघींमधील भांडणाने ते पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नी प्रिया यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी पांढरकवडा पोलिसांनी राजू तोडसाम यांच्या पहिल्या पत्नीसह १० जणांविरुद्ध विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रिया शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आमदार राजू तोडसाम यांच्या पहिल्या पत्नी अर्चना येडमे तोडसाम व त्यांच्या नातेवाईकांवर भा. द वि़ कलम ३९४, ३५४ (ब), ५००, ५०४, ५०६, २९४, ३२३, ३४१, १४३, १४७, १४९, २७९, ३३७, ३२३ या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

आर्णी मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये फेब्रुवारीमध्ये पांढरकवडा येथे हाणामारीची घटना घडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला बचत गट सक्षमीकरणाच्या महिला मेळाव्यासाठी येत असताना आदल्या दिवशी हा प्रकार घडला होता.

आमदार राजू तोडसाम यांचा वाढदिवस असल्याने त्या निमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पांढरकवडा येथे बायपास पॉइंटवर मुख्यमंत्री चषक कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने तेथे जमले होते. आमदार राजू तोडसाम हे आपली दुसरी पत्नी प्रियासोबत मैदानाकडे येत असताना त्यांची पहिली पत्नी अर्चना व तिच्या नातेवाईकांनी त्यांना घेरले. यावेळी अर्चना व प्रिया यांच्यामध्ये शिवीगाळ झाली. ‘आपल्याला व दोन मुलांना सोडून तोडसाम तुझ्याकडे राहत असून, तू त्याला आपल्या नादी लावले’ असा आरोप अर्चना तोडसाम व तिच्या नातेवाईकांनी केला. तर प्रियाने माझ्याजवळ पहिल्या पत्नीला फारकत दिल्याचे कागदपत्र असल्याचे सांगितले.

दरम्यान, अर्चनाने प्रियाला जोरदार मारहाण सुरु केली. त्यावेळी मदतीसाठी ती ओरडत होती. जमलेले लोक मोबाइलमध्ये सर्व प्रकार चित्रित करुन आनंद घेत होते. त्यानंतर काही लोकांनी प्रियाला सोडविले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याची तालुकाभर चर्चा रंगली होती.

यावेळी पहिल्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दुसऱ्या पत्नी प्रिया व त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर आता दुसऱ्या पत्नीच्या फिर्यादीवर पहिल्या पत्नी व तिच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like