शिवसेनेमुळे 90 दिवस तुरुंगात राहिलेल्या जगतापांना शिवसैनिकांचा ‘कळवळा’ का ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना 90 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. शिवसेनेच्या आग्रहाखातर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. परंतु त्यांच्याविरोधात कुठलाही पुरावा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना बाहेर यावे लागले. आता शिवसैनिक व माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी निवेदन देऊन फुलसौंदर यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल झाला असून त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवसेनेमुळे नव्वद दिवस तुरुंगात राहिलेल्या जगताप यांच्या भूमिकेवरून शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

केडगाव हत्याकांडानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत रास्तारोको आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे गुन्ह्यात सहभाग असल्याचा पुरावा उपलब्ध नसतानाही त्यांनी नव्वद दिवस तुरुंगाची हवा खाल्ली. शिवसेनेमुळे त्यांच्यावर ही वेळ आली. पण आता कट्टर शिवसैनिक असलेले व शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत.

त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जगताप यांनी केली आहे. शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांची बाजू जाहीरपणे घेण्याच्या अगोदरच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी फुलसौंदर यांची बाजू घेतली होती. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

जगताप हे काही दिवसांपासून शिवसेनेच्या वाटेवर आहेत. परंतु अद्याप सकारात्मक पाऊल उचलले गेलेले नाही. त्यामुळे जगताप यांनी निवेदन का दिले, याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी निवेदन देऊन गांधीगिरी केली आहे, की खोट्या गुन्ह्यात गोवल्याची जाणीव करून देण्याचा आहे, की शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असल्याने शिवसैनिकांचे मन आपल्या बाजूने करून घेण्याचा प्रयत्न आहे. याबाबतचा उलगडा होऊ शकला नाही. कारण काहीही असले, तरी आमदार जगताप यांची ही भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-