आमदार संग्राम जगताप – माजी महापौरांचे पोलीस ठाण्यातच ‘सेटलमेंट’, NCP च्याच पदाधिकाऱ्याचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेनंतर आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी मला धक्काबुक्की केली. माजी महापौर अभिषेक कळमकर यांना चपलेने मारहाण केली. पोलीस ठाण्यात कळमकर व आ. जगताप यांच्यात सेटलमेंट झाल्यानंतरच त्यांनी फिर्याद दिली नाही, असा आरोप राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे.

काळे म्हणाले की, काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आमचे दैवत खासदार शरदचंद्रजी पवार साहेब नगर दौऱ्यावर होते. दुपारी साडेबारा वाजता नंदनवन लॉन्स या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. हा मेळावा पार पडल्यानंतर पवार साहेब निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर त्या ठिकाणी मोठा अनुचित प्रकार घडला. यातील एक प्रसंग माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या समवेत घडला. तर दुसरा प्रसंग आदरणीय पवार साहेब व्यासपीठावरून उतरल्यानंतर आपल्या गाडीकडे जात असताना मीही त्या दिशेने चाललो होतो त्यावेळी माझ्या स्वतःच्या समवेत घडला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी मला गराडा घातला. धक्काबुक्की सुरू केली. त्याठिकाणी त्यांनी चहूबाजूंनी मला घेरून धक्काबुक्की केल्यामुळे आणि सदर गुंड कार्यकर्ते उंच असल्यामुळे माझा श्वास त्यामध्ये गुदमरला. सर्व शक्ती निशी त्याला प्रतिकार करून त्यातून मी कशीबशी वाट काढत पटकन बाहेर पडत श्वास घेतला. हा प्रकार नेहमीच्या झालेला आहे.

त्याला तोंड देऊन मी नंदन लॉन्समधून बाहेर पडत असताना त्याठिकाणी माजी महापौर अभिषेक कळमकर आणि आमदार जगताप यांच्या गुंड कार्यकर्त्यांची त्याठिकाणी हमरीतुमरी सुरू होती. सदर गुंडांनी कळमकर यांना चहुबाजूने घेरत त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्याठिकाणी शिवीगाळ केली. यावरच न थांबता त्यांनी कळमकर यांना चपलांनी मारहाण केली.

हा प्रकार पाहिल्यानंतर मी गाडीतून उतरून अभिषेक कळमकर यांच्या मदतीला धावून गेलो आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अरेरावी करणाऱ्या गुंड कार्यकर्त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला दोघांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यानंतर एका वाहनांमध्ये बसवून आम्हाला सभा स्थळापासून दूर नेले.

मी व अभिषेक कळमकर पोलिसांच्या समवेतच आम्ही दोघे जण घडलेल्या प्रकाराची फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलिस स्टेशन येथे गेलो. त्याठिकाणी माध्यमांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने जमले होते. तसेच माझे व कळमकर यांचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी जमले होते. कोतवाली पोलिस निरीक्षक यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद घेण्याची प्रक्रिया सुरू केली.

सुरुवातीला अभिषेक कळमकर यांनी त्यांच्या समवेत घडलेल्या प्रसंगाची फिर्याद त्या ठिकाणी दिली. त्यानंतर मी माझ्या समवेत घडलेल्या प्रसंगाची स्वतंत्र फिर्याद दिली. दोन्ही फिर्यादीच्या प्रिंट देखील घेण्यात आल्या. या प्रक्रीये दरम्यान जेष्ठ नेते दादा कळमकर हे देखील कोतवाली मध्ये आले. दरम्यानच्या काळामध्ये त्याठिकाणी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते हे त्याठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही कळमकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आमदार संग्राम जगताप हे स्वतः त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बंद दारामध्ये दोन्ही कळमकर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मी देखील सुरुवातीला त्या खोलीमध्ये उपस्थित होतो. परंतु सदर चर्चा आणि वाटाघाटी या जगताप आणि कळमकर यांच्यामध्ये सुरू असल्याने आणि मला स्वतःला यामध्ये काडीमात्र ही रस नसल्याने मी सदर खोली मधून तात्काळ बाहेर निघून आलो. माध्यमांच्या प्रतिनिधींनी देखील मी बाहेर आल्याचे त्या ठिकाणी पाहिले.

काही वेळानंतर मला आत बोलाविले असल्याचा निरोप आला. मी पुन्हा आत मध्ये गेलो आणि याबाबत आपल्याला काही चर्चा करायची नाही असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर परत आमदार संग्राम जगताप यांनी अभिषेक कळमकर यांना वेगळ्या खोलीमध्ये येऊन चर्चा करण्या बाबत आग्रह धरला. मला देखील त्यांनी त्यासाठी सोबत घेतले. त्यांची आपापसात चर्चा सुरु झाल्या नंतर मी पुन्हा त्या ठिकाणाहून तात्काळ बाहेर पडलो.

खरंतर मला त्या ठिकाणी माझी फिर्याद नोंदवायची होती. त्याची प्रत देखील मी पोलिसांकडे मागितली होती. त्यांनी देखील ती घेण्या संदर्भामध्ये त्यांच्या कनिष्ठांना सूचना केली. मात्र फिर्याद देण्यासाठीची परिस्थिती त्या ठिकाणी एवढे मोठे नेते आल्यामुळे आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे राहिली नाही. त्यामुळे शेवटी वैतागून मी कोतवाली पोलिस स्टेशन मधून बाहेर पडलो.

या दरम्यानच्या काळामध्ये आमदार जगताप आणि दोन्ही कळमकर यांच्यामध्ये बंद खोलीत झालेल्या सेटलमेंटमध्ये माझा कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही. त्यात माझा काडीमात्रही संबंध नाही. बराच काळ लोटल्यानंतर ही सगळी नेतेमंडळी कोतवाली मधून निघून गेली असावीत म्हणून मी पुन्हा कोतवाली मध्ये पोहोचलो. आतमध्ये आलो असता त्याच वेळेला कळमकर यांच्या गाडीतून दादाभाऊ कळमकर, अभिषेक कळमकर, आ. संग्राम जगताप एकत्र बाहेर पडत होते.

त्यांनी मला पाहिल्यानंतर जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांनी मला त्यांच्या गाडीमध्ये बसण्याचा आग्रह धरला. मी आपल्या समवेत येऊ शकत नाही याची त्यांना कल्पना दिली. परंतु तरी देखील त्यांनी आग्रह धरला. पक्षातील ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्या त्यांना नाही म्हणत असताना देखील त्यांनी मला गाडीमध्ये बसवले. त्यानंतर श्री कळमकर यांच्या निवास्थानी आम्ही सर्वजण गेलो. तिथे गेल्यानंतर कळमकर आणि आमदार संग्राम जगताप त्यांच्यामध्ये परत बंद खोली चर्चा सुरू झाली. कोतवाली मध्येच या नेते मंडळींमध्ये सेटलमेंट झाली होती. ही सेटलमेंट कशा प्रकारची झाली, त्याच्याविषयी आपल्याला कल्पना नाही. परंतु सेटलमेंट झाल्यामुळेच त्याठिकाणी फिर्याद तयार असून देखील स्वतः कळमकर यांनी देखील दिली नाही आणि माझी देखील देऊ दिली नाही. कळमकर यांच्या निवासस्थानी देखील यांची बैठक सुरू असताना मी त्या बैठकीमध्ये अजिबात सहभागी झालो नाही. तिथे पोहोचताच मी तात्काळ त्याचे निवासस्थान सोडले आणि तिथून बाहेर पडलो.

घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय स्वरूपाचा होता. शहराचा प्रथम नागरिक राहिलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे लक्ष्य करणे निंदनीय तर आहेच परंतु अशा घटनेतून सोयीस्कर रित्या माघार घेणे हे देखील अयोग्य आहे. आमदार जगताप आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांच्या दहशतीचा मी स्वतः यापूर्वी अनेक वेळेला अनुभव घेतलेला आहे. हे सर्व नगरकरांना देखील माहिती आहे. आत्ताच काही महिन्यांपूर्वी ज्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील शहर जिल्हाध्यक्ष निवडी संदर्भात राष्ट्रवादी भवन येथे आले तेव्हा आमदार अरुण जगताप आणि माझ्या मध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी देखील असाच प्रकार त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी माझ्यावर केला होता.

जगताप-कळमकर एकाच नाण्याच्या दोन बाजू
शहरांमध्ये यामुळे अत्यंत भीतीमय वातावरण यामुळे निर्माण झालेले आहे. खरंतर काल घडलेल्या प्रकारानंतर कळमकर यांनी सुरुवातीला घेतलेली आक्रमक भूमिका आणि नंतर सेटलमेंट करून करून त्यावर टाकलेला पडदा याचे मला फारसे आश्चर्य वाटत नाही. कारण अहमदनगर शहराला माहिती आहे जगताप आणि कळमकर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून महानगरपालिकेची निवडणूक असेल त्यावेळी आणि इतरही वेळेला मी कधीही पक्षाशी गद्दारी केली नाही. मी पक्षाशी कायम प्रामाणिक राहिलो आहे, असेही काळे म्हणाले.

Visit – policenama.com