आ. संग्राम जगताप यांच्या उमेदवारीचे नेमके गणित काय ?

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा आदेश देणाऱ्या राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी का उमेदवारी दिली असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. डॉ. विखे यांचे भाजपातील महत्त्वाचे पाठीराखे आ. शिवाजी कर्डिले यांची गोची करण्यासाठीच जगतापांना उमेदवारी दिली असावी, अशी चर्चा राजकीय तज्ज्ञांत सुरू आहे.

आ. संग्राम यांनी केडगाव दुहेरी हत्याकांडातून स्वतःचा बचाव करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देण्याचा आदेश दिला होता. त्याची जाहीर कबुली ही आ. संग्राम जगताप यांनी दिली होती. त्यावर नगर येथील पत्रकार परिषदेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करून पक्षाच्या सर्व नगरसेवकांची हकालपट्टी केली होती. मात्र त्यांना आदेश देणाऱ्या आ. संग्राम जगताप यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. उलट त्यांना आता लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपला पाठिंबा देण्याची बक्षीसी दिली नाही ना, असा आरोपही केला जाऊ लागला आहे. अशी परिस्थिती असताना आ. संग्राम यांना नेमकी का उमेदवारी दिली, यावर चर्चा सुरू झाली आहे.

आ. संग्राम जगताप हे भाजपचे आ. शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. डॉ. सुजय विखे यांना भाजप प्रवेश करण्यासाठी त्यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी व पक्ष प्रवेशाच्या नियोजनाची धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्डिले यांच्यावर सोपवली होती. नगर लोकसभा मतदारसंघातील आ. शिवाजी कर्डिले वगळता इतर आमदार हे विखे यांच्या लोकसभा उमेदवारीवर समाधानी राहणार नाहीत. आ. मोनिका राजळे यांनी विखे यांना विरोध दर्शविला होता. पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे त्यांच्या प्रवेशास हजर राहिले. ते पक्षविरोधी भूमिका घेण्यास अजिबात परिस्थितीत नाही. परंतु ते समाधानी नाहीत. खा. दिलीप गांधी यांचा गट विरोधात आहे. अजूनही उमेदवारीसाठी खा. गांधी हे आग्रही आहेत. अशा राजकीय परिस्थितीत डॉ. विखे यांचे भाजपातील महत्त्वाचे सारथी असलेले आ. शिवाजी कर्डिले यांची गोची करून विखे विरोधात कुरघोडी करण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

सुरुवातीला आ. अरुण जगताप यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यांच्याऐवजी पुत्र आमदार संग्राम जगताप यांचा लोकांशी जनसंपर्क करण्याची पद्धत पाहता त्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आ. संग्राम जगताप यांची उमेदवारी जाहीर झाल्याने नात्या-गोत्याचे राजकारण करणारे आ. शिवाजी कर्डिले यांची चांगलीच गोची झाली आहे. पक्षाचा प्रचार करायचा की जावई संग्राम जगताप यांना साथ द्यायची, असा मोठा पेचप्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. यावर आ. कर्डिले नेमकी काय भूमिका घेतात, यावर अनेकांचे लक्ष लागले आहे. आ. कर्डिले यांनी जावयाचे काम केल्यावर त्याचा मोठा फटका भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आदेश डावलणाऱ्या आ. संग्राम यांना उमेदवारी देणे ही पक्षाची हतबलता होती की राजकीय खेळी आहे, यावरून नगरचे राजकारण चांगलेच चर्चेचा विषय ठरू लागले आहे.