मनसे आघाडीत आली तर… ; इच्छुकांची घालमेल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्ष लागले आहेत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस आघाडीत सामावून घेण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आणि पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे यांच्या इच्छुकांच्यामध्ये घालमेल झाली आहे.

पुण्यातील आठ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला चार आणि काँग्रेसला चार मतदारसंघ अशी वाटणी अपेक्षित आहे. आता त्यात मनसे वाटा मागणार हे स्पष्ट आहे. खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादीला आणि पुणे कॅन्टोन्मेंट काँग्रेस पक्षाला मिळेल. हडपसर मतदारसंघावर तीनही पक्ष दावा करतील आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे इच्छुकांमध्ये जोरदार चढाओढ कमालीची होईल. हडपसर मतदारसंघावरील दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहजासहजी सोडणार नाही.

पुण्यातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मनसेने पाठिंबा दिला पण काँग्रेसच्या वाट्याचे मतदार संघ मनसेला देण्यास काँग्रेसमधूनच विरोध होईल. पर्वती मतदारसंघात काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रवादीचे दोन असे पाच इच्छुक आहेत, त्यात मनसेसाठी त्याग करण्याची तयारी कितपत राहील? ही शंका आहे. वडगांव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादीच काँग्रेसच्या प्रचारात आघाडीवर होते, हे इच्छुक मनसेसाठी जागा सोडतील का? हे पहावे लागेल. शिवाजीनगरमध्ये काँग्रेसमध्ये तीन इच्छुक आहेत त्यामुळे काँग्रेस हा मतदारसंघ सोडणार नाही. कसबा मतदारसंघात हीच स्थिती आहे.कोथरूडमध्ये राष्ट्रवादीत इच्छुक आहेत. ते मनसेसाठी जागा सोडण्यास तयार होतील का? याकडे लक्ष राहील.