सावधान ! मोदी सरकारच्या ‘या’ योजनांच्या नावावर अनेकांची ‘फसवणूक’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पाचशे रुपयांचे मोबाइलचे फ्री रिचार्ज, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तरुणांना मोफत लॅपटॉप वाटले जाणार आहेत आदींचे आम्ही दाखवून बनावट वेबसाइट तयार करून त्याच्या लिंक व्हॉट्सअ‍ॅपवर टाकून फिरविण्यात येत आहेत. हा प्रकार नागरिकांना बसविण्याचा असून, नागरिकांना विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नगरच्या सायबर पोलिस स्टेशनने केले आहे.

सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे, असा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित होत आहे. ग्रामीण भागात अनेकांच्या मोबाइलवर असे संदेश गेले आहेत. त्यामध्ये कर्जमाफीच्या यादीत स्वतःचे नाव शोधण्यास सांगितले आहे. त्यासाठी एक लिंक पाठविण्यात आली आहे. त्यात आधार नंबर, पॅन नंबर, मोबाइल नंबर मागविण्यात आले आहेत. अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर असे बनावट मेसेज पाठविण्यात आले आहेत. हे सर्व खोटे आहे. वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊन आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, तसेच असे फसवे मेसेज आपल्याकडून दुसऱ्याच्या मोबाइलवर पाठऊ नये, असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनकडून करण्यात आले आहे.

याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या नावाने पाचशे रुपयांचे मोबाइल रिचार्जचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित करण्यात येत आहेत. मोदी सरकार ऑफर ब्लॉगस्पॉट या नावाने रिचार्चचे मेसेज व्हायरल करण्यात आलेले आहेत. हे मेसेज बनावट असून, तुमची माहिती घेऊन फसविण्याचा हा प्रकार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मोफत लॅपटॉप वाटले जात आहेत, असे सांगणारी बनावट वेबसाइट तयार करण्यात आली आहे. त्यावरून लोकांकडून माहिती भरून घेण्यात येत आहे. सदर प्रकार बसण्याच्या उद्देशाने असून नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहनही सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी केले आहे.